

सिध्दटेक: पुणे व भीमा नदी खोर्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने भीमा नदीला पूर आला आहे. सिध्दटेक-दौंड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
उजनीची पाणी साठवण क्षमता 123 टिएमसी सध्याचा पाणीसाठा 117 टिएमसी झाला आहे. गुरूवारी दुपारी भीमा पात्रातील विसर्ग 1 लाख 37 हजार क्युसेकवर पोेहचला. उजनी धरणातूनही 1 लाख विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. (Latest Ahilyanagar News)
धरण भरल्यानंतर पाणी वाटपाचे नियोजन बिघडले तर काय होते, याची प्रचिती 2018 व 2024 मध्ये आलेली आहे. पूर्वानुभव पाहता धरण भरल्याने यंदा पाणी वाटपाचे नियोजन सुयोग्य करण्याची मागणी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
भिमा पात्रात पाण्याची आवक वाढल्याने सखल भागातील शेतीमध्ये पाणी घुसले आहे. कापूस, मका व नवीन लागवड, आडसाली ऊस पाण्यामध्ये बुडाले आहेत. बुडालेले क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. सिद्धटेक, दुधोडी, भांबोरा, गणेशवाडी येथील शेतरस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सुमारे चार लाख हेक्टर ओलिताखाली!
उजनीचे पाणलोट क्षेत्र 14856 चौ.कि.मी असून धरणाखाली 29 हजार हेक्टर क्षेत्र आहे. 3 लाख 97 हजार 800 हेक्टर क्षेत्र ओलीता खाली आले आहे. तसेच उजनी डावा कालव्यातून 96 हजार तर उजवा कालव्यामुळे 51 हजार 800 हेक्टर क्षेत्र ओलीता खाली आहे. धरणामुळे पुणे जिल्हयातील 25, सोलापूर जिल्हयातील 23 आणि अहिल्यानगर जिल्हयातील 3 गावे पूर्णतः धरण क्षेत्रात गेलेली आहेत.