

राहुरी : राहुरी तालुक्यातील 83 गावांमधील सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीमध्ये 43 गावांमध्ये महिलांना गावगाडा हाकण्याची संधी मिळणार आहे. 2025 ते 2030 या काळासाठी गावनिहाय सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर वर्षभरापासून सरपंच पदाची तयारी करणार्या अनेक इच्छुकांचे राजकीय गणित चुकले. मात्र आता आपल्या सौभाग्यवतींसाठी ही संधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते आहे. एकूणच, महिला आरक्षणामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशीच काही अवस्था झालेली आहे.
राहुरी तालुक्यामध्ये आरक्षण सोडतीमध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जातीच्या एकूण 11 गावांपैकी 6 गावांमध्ये महिलाराज असणार आहे. अनुसूचित जमातीमध्ये 15 गावांपैकी 8 गावांमध्ये महिला काम पाहणार आहे. नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी निवडीत झालेल्या 22 गावांपैकी 11 गावांमध्ये महिला सरपंच म्हणून असतील. तर सर्वसाधारण जागेवर 35 गावांना संधी असून त्यामध्ये 18 गावे महिलांसाठी राखीव आहेत. याप्रमाणे एकूण 83 गावांपैकी सर्वाधिक 43 गावांचा कारभारी होण्यासाठी महिलांना संधी मिळाली आहे.
वांबोरी गावामध्ये सर्वाधिक चर्चा आरक्षण सोडतीनंतर होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यातील राजकीय लढा आरक्षण सोडतीनंतर पेटणार असल्याची चर्चा आहे. वांबोरी गावामध्ये महिलांच्या नागरी मागास प्रवर्गाला आरक्षण लाभल्याने कुणबी दाखल्यावर स्वार होणार्या भावी महिला सरपंचाची चर्चा वाढली आहे. यासह टाकळीमिया गावात तर सर्वसाधारण व्यक्तीला सरपंच पद जाहिर झाल्याने गावामध्ये सर्वच क्षेत्रातील राजकीय व्यक्तींना सरपंच पदाचे डोहाळे लागल्याचे बोलले जात आहे. आरडगाव गावातही सरपंच रविंद्र म्हसे व माजी उपसरपंच सुनिल मोरे यांच्या राजकीय विरोधाला सर्वसाधारण व्यक्ती म्हणून सोडत झाल्याने राजकीय धार लाभणार आहे. आरडगावात राजकीय आरक्षण सोडतीचा लाभ घेण्यासाठी अनेक इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
बारागाव नांदूर गावामध्ये महिला नागरीकांचा मागास प्रवर्ग म्हणून सरपंच पदाला संधी मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी गावाची निवडणूक झालेली आहे. जि.प.सदस्य धनराज गाडे विरोधात लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे यांच्या राजकीय लढतीमध्ये आरक्षण सोडतीमुळे नविन ट्विस्ट निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सात्रळ गावामध्ये अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गाला आरक्षण लाभल्याने गावातील राजकीय प्रतिष्ठित नेत्यांचे अपेक्षाभंग झाले आहे. परंतु गावात वर्चस्व राखण्यासाठी गावनेते सात्रळ गावात आपली मेढ रोवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उंबरे गावातही नामदेवराव ढोकणे, सुनील आडसुरे यांच्या सौभाग्यवतींना संधी आहे. याप्रमाणे वेगवेगळ्या गावांमध्ये सोडत झालेल्या आरक्षणाच्या चर्चेचे गुर्हाळ गावा-गावात तापले आहे.
अनुसूचित जाती 5 : आंबी, तांदुळनेर, गणेगाव, मल्हारवाडी, जांभळी, खुडसरगाव
अनुसूचित जमाती 8 : कोंढवड, खडांबे बु., दवणगाव, सात्रळ, निंभेरे, तुळापूर, तांभेरे, गुंजाळे,
नागरिकांचा मागास प्रवर्ग 10 : चिखलठाण, उंबरे, बारागाव नांदूर, कुक्कडवेढे, उंबरे, वांबोरी, कात्रड, वळण, संक्रापूर, बोधेगाव, केंदळ खुर्द, खडांबे खुर्द
सर्वसाधारण 17 : तांदुळवाडी, तिळापुर, रामपूर, चेडगाव, कोपरे, घोरपडवाडी, लाख, केंदळ बु., पिंपळगाव फुणगी, चिंचविहिरे, कोळेवाडी, करजगाव, कनगर खुर्द, पिंप्री वळण, ताहाराबाद, धानोरे, चांदेगाव.