

खर्डा: जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातून जाणारा व शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर जिल्यातील शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू येथून भाविक येतात. तसेच महाराष्ट्रातीलही भाविक तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूरकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र, खर्डा-जामखेड रस्त्यावर तुटलेले पूल, खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक ठरतो आहे. शहरालगत गोलेकर लवण येथे ओढ्याला पाणी आल्याने प्रवाशांना दीड तास वाहनात बसून राहण्याची वेळ आली.
महामार्गावरील दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचून रस्ता दिसेनासा होतो. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या अपघातांत काहींना जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. रविवारी (दि. 14) दुपारी सतेवाडी फाट्याजवळ खड्डा चुकवताना एक वाहन मैलाच्या दगडावर आदळून उलटले. त्यात काही प्रवासी जखमी झाले.
संबंधित विभागाकडून केवळ डागडुजी करण्यात येते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार न घेतल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संघटनांनी दिला आहे