

श्रीरामपूर: गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. पुण्यातील दोन डॉक्टर व अन्य एक अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सोळावर पोहचली आहे.
डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर,पुणे), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव,पुणे) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (केशनांदगाव हवेली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश केल्यानंतर तपासात गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे. 10 हजार रुपये घेवून डॉक्टर मुलगा की मुलगा सांगत होते. लिंग निदानासाठी गर्भवती महिला घेवून जाणाऱ्या एजंटांना प्रत्येकी 3 हजार रूपये मिळत होते.
गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाच्या गुन्ह्यात 3 डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांचे पती अशा तेरा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींची संख्या सोळावर पोहचली असून यात 5 डॉक्टर आहेत.
डॉ. भणगे व रवींद्र ढगे या दोघांकडून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केले आहे. पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान केले जात होते. हे मशीन कोठून आणले याची चौकशी करता पुण्यातील दोघा डॉक्टरांसह तिघांची नावे समोर आली. त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अमोल भारती, लोणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे अधिक तपास करत आहेत.
पुण्यात मशीन पुरवणारे कोण?
पुण्यातील डॉक्टरांकडून पुरविले जाणारे मशीनचा मुळ उगम कोठे आहे. यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
श्रीरामपूरचा डॉ.शेख होमगार्डचा सेवानिवृत्त समादेशक
बुधवारी श्रीरामपुरात अटक केलेला डॉक्टर राज शेख हा बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या पुरवत होता. तशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. शेख हा होमगार्ड समादेशक म्हणूनही कार्यत होता. आता तो सेवानिवृत्त झाला आहे. मात्र होमगार्ड समादेशकाचे नाव बेकायदा गर्भपात प्रकरणात समोर आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेख याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.