

बोधेगाव: शेवगाव शहरांमधील अतिक्रमणांचा मुद्दा गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्यभर गाजत आहे, आता नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी पुढाकार घेतला असून, अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील अतिक्रमानांवर हातोडा घातला आहे. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. (Ahilyanagar News Update)
अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूकीची सतत कोडी होत असून जनतेला प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. शेवगाव शहरात अतिक्रमणे हटविण्यास झाल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
शेवगाव शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून, शहरातून जाणार्या गेवराई, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर रस्त्यावरील अतिक्रमण फेब्रुवारीमध्ये हटविण्यात आली होती. त्यानंतर शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक, वरूर रस्ता, जामा मजीद, मोची गल्ली या महत्वाच्या भागांत अतिक्रमणधारकांना दीड महिन्यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अतिक्रमणधारकांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करून स्वतः अतिक्रमण हटविली. मात्र, काही व्यावसायिकांनी अतिक्रमण हटविली नाहीत. त्यामुळे बुधवारी (दि. 30) शेवगाव नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांनी् पुढाकार घेत स्वतः रस्त्यावर उतरून जेसीबी च्या साह्याने अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम राबवली. त्यात अनेकांनी स्वतः अतिक्रमण हटविली. त्यामुळे पथकाचा ताण हलका झाला. अतिक्रमणे काढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.