

नेवासा: तालुक्यात बुधवार व गुरूवारी रात्री दोन दिवस वादळी पावसाने तालुक्याला झोडपले. तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी घरे पडण्याच्या घटना घडल्या असून सौंदाळा गावाजवळ रस्त्यावरील झाड एका दुचाकीस्वरावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
या घटनेत कुकाणा (ता.नेवासा) येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी अमोल नवनाथ पंडित यांचा मृत्यू झाला. अंगावर झाड पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वादळी पावसाने तालुक्यात सर्वत्र दाणादाण केली. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यातील सोनई, शिरसगाव, पानेगाव, भेंडा, कुकाणा,जेऊर हैबती, देडगांव, वडाळा बहिरोबा, महालक्ष्मी हिवरेंसह तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे सूचना आमदार विठ्ठल लंघे यांनी नेवासा तहसिलदार व तालुका कृषी अधिकार्यांना केल्या आहेत.
बुधवारी व गुरूवारी रात्री सात वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह परिसरात एक इंच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या वादळी पाऊस झाल्याने बहुतेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडल्या, तर सौंदाळा येथे राज्यमार्गावर सुबाभूळ झाडाची फांदी रस्त्यावर पडली होती. नेवासा येथून कुकाण्याला दुचाकीने घरी येत असतांना धान्य दुकानदार अमोल नवनाथ पंडित (वय 42) यांचा रस्त्यावर पडलेल्या फांदीला धडकून मृत्यू झाला.
कुकाणा येथे भाऊसाहेब फोलाणे यांच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना साठवून ठेवलेला कांदा वादळी पावसाने भिजला. मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद पडले होते. त्यामुळे एकमेकांशी संवाद व ऑनलाईन व्यवहारही ठप्प झाले. निपाणी निमगाव येथील संदीप आदमने यांच्या घरांवरील पत्रे वादळाने उडाले. नारळ व इतर झाडे उन्मळून पडली.
करंजी ते भेंडा उच्चदाब वाहिनीचे रांजणगावदेवी परिसरात 4 मनोरे पडले, तर एक मनोरा वाकल्यामुळे लक्ष्मण कचरू पेहरे यांची कपाशी, तुकाराम भानुदास पेहरे यांच्या तूर, कांदा, कपाशी, हरिभाऊ भरत पाडळे यांच्या तूर, उडीद व मच्छिंद्र यशवंत पाडळे यांच्या कांदा, सुभाष अशोक कोलते यांच्या ऊस पिकाचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले.
नेवासा शहर व परिसराता पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. सखल भागात पाणी साचले होते. शहरातील मारूती चौकातील काही घरांजवळ वीज कडाडल्याने राजू पानसरे, अशोकराव डहाळे,प्रकाश जगताप, शंभू जंगले आदिंच्या घरातील टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर, पंखे अशा विविध वस्तू जळाल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाला होता.
नुकसीनीचे पंचनामे करण्याच्या सूचना
विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस झाल्यामुळे आपण नेवासा तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकार्यांना तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आमदार विठ्ठल लंघे यांनी सांगितले.