

नगर: युरिया खतासाठी पर्यायी खते व औषधे खरेदी करण्याची सक्ती करणार्या कृषी सेवा केंद्रांवर भरारी पथकांच्या माध्यमातून डमी गिर्हाईक पाठवून शोध घ्या. तपासणीत असे प्रकार आढळल्यास संबधित कृषी सेवा केंद्रांवर तत्काळ कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विभागाला दिले. बियाणे बोगस निघाले अशी तक्रार कोणत्याही शेतकर्यांकडून येता कामा नये, असा इशारा देखील त्यांनी महाबीज कंपनी अधिकार्यांना दिला. शेतकर्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सन 2025 -26 खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सर्वश्री विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते. (Ahilyanagar News update)
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, निव्वळ तालुका व ग्रामीणस्तरावरील कृषी अधिकारी तालुका ठिकाणी राहातात. त्यामुळे त्यांच्या भरोशावर राहू नका. तालुकास्तरावर शेतकर्यांची बैठक घ्या. या बैठकीत कोठे लिंकिंग सुरु आहे. याची खरी माहिती शेतकर्यांकडून मिळेल. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत आमदारांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठका घ्या असे निर्देश जिल्हा कृषी विभागाला देण्यात आले.
शेतकर्यांच्या मागणीनुसार त्यांना निर्भेळ, दर्जेदार व पुरेशा प्रमाणात खते व बी-बियाणे मिळतील याची काळजी घ्यावी. प्रत्येक कृषी केंद्राबाहेर बियाणे व खते यांचा पुरवठा व शिल्लक साठा दर्शवणारा फलक लावावा. शेतकर्यांची फसवणूक करणार्या कृषी केंद्रांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. कृषी योजनांची माहिती प्रत्येक शेतकर्यापर्यंत पोहोचावी यासाठी योजनांची पुस्तिका प्रकाशित करावी. योजनांची माहिती समाजमाध्यमांद्वारेही द्यावी. प्रधानमंत्री पीक विम्याच्या नवीन लाभ प्रक्रियेविषयी शेतकर्यांमध्ये जागृती करावी. शेतकर्यांचे प्रश्नसोडविण्यासाठी ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, विनाशुल्क हेल्पलाईन सुरू करावी. कालबाह्य योजनांचा आढावा घेऊन कृषी आयुक्तांना अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
खरीप हंगाम उत्साहवर्धक व चांगले उत्पन्न देणारा ठरेल. शेतकर्यांच्या जीवनात सुख व समृद्धी यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत कृषी विभागाने सुरू केलेला ‘शेतकरी डॉक्टर’ उपक्रम तसेच ‘शेतीचा सखा’ चॅटबोट उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेस पात्र शेतकर्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेले नियोजन व विविध योजनांची अंमलबजावणी याचे सादरीकरण केले. यावेळी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.
निर्यातीसाठी सुविधावर भर द्या
इतर जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकर्यांना मिळावी यासाठी कृषी पर्यटन योजना सुरू करण्यासाठी कृषीमंत्र्यांशी चर्चा करू. उत्पादनाबरोबरच निर्यातीमध्ये जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी पायाभूत सुविधा निर्माणावर भर द्यावा, असे निर्देश विखे पाटील यांनी कृषी विभागाला दिले.
शेतकर्यांनी वाचला तक्रारीचा पाढा
मुंडे अपघात योजनेतील त्रुटी दूर करा, पर्यायी खते खरेदी करण्याची सेवा केंद्रांकडून सक्ती केली जाते, हंगाम संपल्यानंतर औषधी मिळतात, फळबागासाठी अनुदानत वाढ करा, जास्त भावाने खते घ्यावी लागतात, ज्यावेळी गरज असतेत्यावेळी खतांचा तुटवडा भासतो, शेतकर्यांसाठी पेन्शन योजना सुरु करा, भाताचे बियाणे घेतले तरच खते दिले जातात, महाबीजचे बियाणे बोगस आहे, कृषी विभागाच्या अनेक योजना कालबाह्य आहेत, मंडल कृषी अधिकारी कार्यालयात सापडत नाहीत अशा विविध तक्रारी जिल्हाभरातून आलेल्या शेतकर्यांनी पालकमंत्र्यांसमोर बैठकीत केल्या.