

पाथर्डी : वादळात उन्मळलेल्या 30 वर्षीय वडाच्या झाडाला आनंदवनात नवजीवन मिळाले आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असतानाच, जिल्हा परिषदेतील एक प्राथमिक शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी एक वडाचं झाड वाचवून नवा आदर्श घालून दिला. (Ahilyanagar News Update)
पाथर्डी येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारातील वादळात उन्मळून पडलेल्या सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला शिक्षक संदीप राठोड यांच्या पुढाकाराने जीवदान मिळाले आहे.
वडाचे झाड वाचवण्यासाठी मोठ्या क्रेनच्या साह्याने या वडाला उचलून मांडवा येथील आनंदवन या पर्यावरण साक्षरतेसाठी प्रसिद्ध ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आले. सुमारे 20 फूट लांब आणि सात फूट रुंद असलेल्या या झाडाचे यशस्वी पुनर्रोपण हे आपल्या भागातील पहिलेच असे अनोखे उदाहरण ठरले आहे.
या उपक्रमामध्ये संदीप राठोड यांच्यासह आनंदवनातील कार्यकारी टीम, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन चळवळ पाथर्डी, आनंद ग्रीन क्लब, श्री आनंद महाविद्यालय व श्री तिलोक हायस्कूल, पाथर्डी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन दिवसांहून अधिक काळ हा उपक्रम अव्याहत सुरू होता. झाडाला पुनर्जीवित करण्यासाठी या सर्व पर्यावरण प्रेमींनी अथक मेहनत घेतली.
पर्यावरण संवर्धनासाठी झटणार्या या संघटनांनी वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त मोहिमा, आणि शाश्वत जीवनशैली यांसारखे उपक्रम राबवून समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.
या झाडाच्या पुनर्रोपणासाठी अहिल्यानगर येथील ’गिरीकर्णिका’ संस्थेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे, तिसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल शेलार, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, अभियंता राजळे, सुभाष केदार, प्रसाद लाहोटी, किशोर कराड, सनी आठरे आदींचे सहकार्य लाभले.
तिसगाव (ता. पाथर्डी) जवळील मांडवे शिवारात निसर्गप्रेमी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून 26 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या आनंदवन प्रकल्पामुळे परिसर हरित बनला आहे. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून 28 हजार वृक्षांचे संगोपन करण्यात आलेे. विशेष म्हणजे, वादळात उन्मळून पडलेला सुमारे 30 वर्षांपूर्वीचा वडाचा वृक्ष स्थानिकांच्या प्रयत्नातून नव्याने रुजवून त्याला जीवनदान देण्यात आले आहे. आज तो पुन्हा पालवी फुलवत आहे. सौरऊर्जेवर चालणारी सिंचन व्यवस्था, विहीर, स्थानिकांची सेवा, महिलांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे ही हरित चळवळ प्रेरणादायी ठरते आहे. संवर्धनावर भर देत, आनंदवन आज पर्यावरण जागृतीचा जिवंत नमुना ठरत आहे.