

नगर: संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने चारा पिकांच्या लागवडीला रोजगार हमी योजनेची जोड दिली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत आता मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास तसेच मल्टीकट ज्वारी आणि बाजरी या पिकांच्या लागवडीची कामे घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, एका हेक्टरसाठी चारापिकानुसार ३५ हजार ते १ लाख १३ हजार रुपयांपर्यंतचे अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात चारा लागवडीची 16 हजार, तर जलसंवर्धन व जलसंधारणासह अन्य प्रकारचीही 60 हजार कामे पुरवणी आराखड्यात घेण्यात आली आहेत.
राज्यात २०२६ ची पावसातील तूट, खरीप पिकांच्या उत्पादनातील आणि रब्बी पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना पुरवणी आराखडा तयार करण्यासंदर्भात आवश्यक सूचना केल्या. या अंदाजपत्रकात मजुरी आणि साहित्य अशा दोन्ही घटकांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत, कृषी अन् पशुसंवर्धनची जबाबदारी
या कामांची अंमलबजावणी ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या कामांना तालुका पशुधन विकास अधिकारी तांत्रिक मान्यता देतील, तर गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील. कृषी विभागाच्या कामांना कृषी पर्यवेक्षक आणि तालुका कृषी अधिकारी, तर पशुसंवर्धन विभागाच्या कामांना पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित सहाय्यक आयुक्त मान्यता देतील. कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणाऱ्या चारा पिकांच्या वाणांना प्राधान्य देण्याच्या सीईओंनी सूचना केल्या आहेत.
मजुरांच्या हाताला काम, पशुधनाला चारा
योजनेअंतर्गत मजुरांमार्फत करता येणारी कामे यंत्राद्वारे करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एकदा चारा लागवड केलेल्या क्षेत्रावर त्याच योजनेतून पुन्हा चारा लागवडीचे काम घेता येणार नाही. लाभार्थी निवड, कामांचे नियोजन आणि योजनेतील सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली असून, ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार आणि पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक अन् वैयक्तीक कामांचा समावेश
सार्वजनिक आणि वैयक्तीक अशी 16 हजार कामे ही चारा लागवडीची घेण्यात आली आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगचीही 1080 कामे आहेत. 1400 बंधाऱ्यातून गाळ काढला जाणार आहे. 265 नवीन बंधारे बांधली जाणार आहेत. 235बंधाऱ्यांची दुरुस्ती करणार आहे. 2425 पानंद रस्ते संकल्पीत आहे. वृक्षलागवडीची 1000 कामे घेण्यात आली आहेत. इतर सार्वजनिक कामे 732 असून, 347 कामे शेतळे, 30 हजार कामे शेतीसाठी जलतारा, 5500 शोषखड्डे, 2300 विहिर पुनर्भरण इत्यादी कामे घेण्यात आली आहेत.
‘त्या’ 290 ग्रामपंचायींनी गांभीर्य नाही?
जिल्हयात 1040 ग्रामपंचायतींनी पुरवणी आराखडे सादर केले आहेत. मात्र अजुनही 290 ग्रामपंचायतींना याबाबत गांभीर्य नसल्याचे पुढे आले आहे. संबंधितांनी 25 तारखेच्या आत आपल्या ग्रामसभा बोलावून त्यातून पुरवणी आराखडे बीडीओंच्या स्वाक्षरीने पुढे पाठवावेत, अशा सूचना करण्यात आल्याचेही समजले.
चारा पिक अन् हेक्टरी अंदाजपत्रक
मका ४७ हजार ३०७ रुपये
बाजरी ३५ हजार ५०५ रुपये
ज्वारी ४२ हजार ७७८ रुपये
नेपियर गवत ७६ हजार ३१ रुपये
लसूणघास १ लाख १३ हजार २९० रुपये
मल्टीकट ज्वारी ५१ हजार ३६ रुपये
मल्टीकट बाजरी ७६ हजार ४४ रुपये ५० पैसे
दुष्काळ अन् चारा टंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपायोजना केल्या जात आहे. त्यासाठी वैयक्तीकसोबतच सार्वजनिक चारा लागवडींचे आवाहन केले आहे.चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात आता ज्या गावात वनविभाग, पाटबंधारे इत्यादीच्या जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणीही चारा लागवड व्हावी, यासाठी प्रयत्न आहे. जलसंधारण आणि जलसंवर्धन कामांचा देखील पुरवणी आराखड्यात समावेश केला जात आहे.
आनंद भंडारी, सीईओ