

संगमनेर : सुसंस्कृत व शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या संगमनेरात ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिम सप्लिमेंट दुकानातून ड्रग्ज सप्लाय होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस छाप्यात समोर आली. राजकीय दबाव झुगारत सहा तासांनी गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केली. (Latest Ahilyanagar News)
आदित्य किशोर गुप्ता असे अटक केलेल्याचे नाव असून तो राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समजते. आदित्य गुप्ता यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तो विकत असलेली औषधे नशेसाठी वापरली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुप्ता याचे शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’ नावाने दुकान आहे. या दुकानातून नशेसाठी वापरले जाणारे औषध अवैधरित्या विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संगमनेर शहर पोलिस पथकाने सोमवारी नशेची औषधे घेण्याकरिता बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. गुप्ता याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ‘त्या’ ग्राहकाला ‘ते’ औषध दिले. लागलीच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने छापा टाकत आदित्य किशोर गुप्ता यास ताब्यात घेतले. दुकानाच्या झडतीत 6 हजार 600 रुपये किमतीच्या इंजेक्शनच्या 3 बाटल्या आणि 9 इंजेक्शन सिरींज, मोबाईल व मोटारसायकलसह 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल करत पोलिसांनी आदित्य गुप्ता यास अटक केली.
शांत सुसंस्कृत आणि वैभवशाली संगमनेर शहरात वर्षभरापासून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अवैध धंदे वाढले आहेत. दादागिरी, दहशतवादासह आता अंमली पदार्थांची तस्करी चिंतेची बाब बनली आहे. भेदाभेद न करता परिवार म्हणून संगमनेर तालुका जपला. निवडणुका येतात जातात, मात्र सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे. ड्रग्ज सापडल्याची बाब धक्कादायक असून त्या विरोधात आता सामान्य जनतेनेच आवाज उठविला पाहिजे.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्री
गुन्ह्यातील संशयित आरोपी आदित्य गुप्ता हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे. गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला, मात्र पोलिसांनी खमकी भूमिका घेत गुन्हा दाखल केला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली, मात्र राजकीय दबावातून गुन्हा दाखल होण्यास रात्रीचे सव्वानऊ वाजले. या प्रकाराची पोलिसांसह राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या गुप्ताकडे ड्रग्ज कोठून आणले, याबाबत चौकशी केली असता त्याने ओतूर येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथक ओतूरच्या त्या पुरवठादाराकडे चौकशीसाठी रवाना झाले आहे. संंबंधित तरुणाचा सहभाग आढळून आल्यास त्यालाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ड्रग्जसदंर्भात केलेल्या कारवाईत ओतूरहून संगमनेर शहरात पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस पथक ‘त्या’ सप्लायर्सला ताब्यात घेण्यासाठी ओतूरला रवाना झाले आहे. त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक