

शिर्डी/ श्रीरामपूर: बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणे गुन्हा आहे. त्याचबरोबर आता लैंगिक अत्याचार करण्याकरिता जागा उपलब्ध करून देणारादेखील सहआरोपी होणार आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजमालक, कॅफेचालक यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
वाकचौरे म्हणाले की, आपल्या हॉटेल लॉजमध्ये येणार्या व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी, त्यांच्या वयाची पडताळणी करावी. संबंधित पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा. किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती हा आरोपी असते.
परंतु याच कायद्यातील काही कलमांनुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारादेखील सहआरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागामालक अर्थात हॉटेलचा, लॉजचा मालक-चालक, कॅफे चालक, मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असते.
श्रीरामपूर विभागात एकूण 17 पोलिस स्टेशन येतात. बाललैंगिक अत्याचाराखाली दाखल व तपासावर असणार्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जर कोणी हॉटेल, लॉजचालक, मालकाने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील आपले हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिले असेल तर त्यांनादेखील गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करण्यात येणार आहे.