

जवळा: तालुक्यातील निघोज येथील मंगेश वराळ या शेतकर्याची सावकाराने बळकावलेल्या चार एकर जमीन व दूध शीतकरण केंद्राचे खरेदीखत उपनिबंधक गणेश पुरी यांनी रद्द केले. याबाबत अधिक माहिती अशी की, निघोज येथील अवैध सावकारीचा व्यवसाय करणारे रंगनाथ किसनराव वराळ पाटील यांच्याकडून सन 2018मध्ये मंगेश वराळ यांनी दूध व्यवसायाचे भांडवलाकरिता व्याजाने रक्कम घेतली होती.
सावकाराने त्याबदल्यात त्यांच्या नावावरील शेतजमीन व दूध शीतकरण केंद्र मुलींच्या नावे खरेदी खताने लिहून घेतले होते. तसेच सह्या केलेले काही धनादेशही घेतले होते. (Latest Ahilyanagar News)
व्याजाने घेतलेली रक्कम परतफेड केल्यानंतर लिहून घेतलेली जमीन पुन्हा फिरवून देण्याच्या बोलीचा करारनामा झाला होता. पुढे व्यवहारात ठरलेली व्याजासह झालेली रक्कम मंगेश वराळ यांनी सावकार रंगनाथ वराळ यांना वेळोवेळी परत केली होती.
व्याजासह संपूर्ण रक्कम परतफेड केल्यानंतर लिहून घेतलेली जमीन पुन्हा फिरवून नावे करून देण्याची मागणी शेतकर्याने सावकार वराळ यांच्याकडे केली. परंतु सावकार वराळ यांनी मंगेश वराळ यांच्या आणखी व्याजाची मागणी केली.
या मागणीला मंगेश वराळ यांनी नकार देऊन याबाबतची तक्रार स्थानिक पंच कमिटी व गावाच्या तंटामुक्ती समितीकडे केली. परंतु प्रश्न मिटला नाही. त्यानंतर शेतकरी मंगेश वराळ यांनी निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेकडे याविषयी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. संस्थेच्या सल्ल्यानुसार शेतकरीवराळ यांनी अॅड. गजानन बोचे व अॅड. रामदास घावटे यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे रंगनाथ वराळ यांच्याविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानंतर सावकार वराळ यांच्या घरी छापा टाकून सावकारीची आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी कार्यालयाकडे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी रंगनाथ वराळ यांनी सावकारीतून जमीन बळकावल्याचा निष्कर्ष काढून सावकार वराळ यांनी बळकावलेली चार एकर जमीन व दूध शीतकरण केंद्राचे खरेदीखत रद्द करण्याचे आदेश दिले.
बळकावलेल्या जमिनीचा सातबारा पुन्हा शेतकर्याच्या नावे करण्याचा हुकूमनामा प्रसिद्ध केला. त्यानुसार सहनिबंधक व दुय्यम निबंधकांनी खरेदीखत रद्द केल्याच्या नोंदी शासन दफ्तरी घेतल्या. तहसीलदारांनीही तलाठी व मंडलाधिकार्यांना आदेश देऊन महसूल दफ्तरी शेतकरी मंगेश वराळ यांचे नाव दाखल करून सातबारा तयार केला.
शेतकरी मंगेश वराळ यांची बाजू अॅड. गजानन बोचे, अॅड. धरणीधर पाटील, अॅड. रामदास घावटे व अॅड. उन्मेश चौधरी यांनी मांडली.
मी ठरल्याप्रमाणे व्याजाने घेतलेली रक्कम फेडूनही, पुन्हा अव्वाच्या सव्वा (चक्रवाढ व्याजाचा) हिशेब जुळवून सावकाराने शेतजमीन बळकावली होती. परंतु तक्रारीची योग्य प्रकारे दखल घेऊन जिल्हा निबंधक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक व महसूल विभाग आणि वकील यांनी योग्य न्याय दिला.
- मंगेश वराळ, तक्रारदार शेतकरी, निघोज
लोकजागृती सामाजिक संस्था अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचारविरोधी काम करते. यापूर्वी या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात तीन सावकारांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. कायदा निर्माण झाल्यापासून अवैध सावकारीतून बळकावलेल्या शेत जमिनीचे खरेदीखत रद्द होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
- अॅड. रामदास घावटे, अध्यक्ष, लोकजागृती संस्था