

जामखेड: तालुक्याला सोमवारी (दि 9) वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वार्याने नागरिकांची झोप उडवली. त्यात खर्डा, मोहरी, जातेगाव दिघोळ व लोणी, जवळा, नान्नज, सातेफळ, सोनेगाव आदी परिसरात नदी-नाले एक झाले होते. ठिकठिकाणी घरांवरील पत्रे, छप्पर उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत.
खर्डा गावात वादळामुळे 20 ते 25 घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, भिंती पडल्याने अनेक जण बेघर झाले आहेत. वाकी येथे झाड ट्रॅक्टरवर पडल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. (Latest Ahilyanagar News)
विजेचे खांब कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री अंधारात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खर्डा व परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने रुद्रावतार धारण केल्याने मोठमोठी झाडे उन्मळून पडली. खर्डा, तरडगाव आणि राजुरी येथील 33 केव्ही फीडर पूर्णपणे बंद पडले. अनेक ठिकाणी शेतीतील पिजेचे खांब पडले. तारा तुटल्या. काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेच्या खांबांचे नुकसान झाले.
त्यामुळे पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला. लिंबोणी, पपई, आंबा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अन्य फळबागा उन्मळून पडल्या. शेतीचेही मोठे नुकसान झाले. मागील दोन दिवसांपासून शेतकर्यांनी खरीप पिकांची पेरणी सुरू केली होती. मात्र रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतजमिनी बांध फुटल्याने वाहून गेल्या. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.
अधिकारी-पदाधिकार्यांकडून पाहणी
खर्डा परिसरातील नुकसानीची अधिकारी व पदाधिकार्यांनी मंगळवारी पाहणी केली. खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, शिवराम लोखंडे, ग्रामविकास अधिकारी मिसाळ साहेब, बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, केशव वनवे, मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे, कृषी सहायक गोपाळघरे, मंडल कृषी अधिकारी कटके, तलाठी विकास मोराळे, ग्रामविकास अधिकारी बहीर साहेब यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
24 तासांपासून बत्ती गुल
खर्डा हे महावितरणचे 33 केव्ही केंद्र असून त्या ठिकाणाहून अनेक सबस्टेशनला वीजपुरवठा होतो. हे सर्व सबस्टेशन 24 तासांपासून बंद आहेत. शेतीपंपांची तसेच सबस्टेशनचे मेन खांब पडल्याने व काही ठिकाणीं तुटल्याने वीजपुरवठा खंडित आहे. महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी मंगळवारी सकाळपासून काम करीत असून, उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.