

नगर: गणेश विसर्जन मिरवणुकीत जल्लोष सुरू असतानाच सरतेशेवटी गालबोट लागले. दीपक रामकिसन वाघस्कर तरुणाच्या मृत्युचे कारण तणावाला कारणीभूत ठरले. आ. संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक थांबवत रात्रीच रस्तारोको सुरू केल्याने तणावात आणखीच भर पडली.
दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळीही चार गणेश मंडळांनी आंदोलन सुरू केले. अखेर भिंगार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे व घटनेची चौकशीचे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून मिळाल्यानंतर लाडक्या बाप्पाला २९ तासांनी निरोप दिला गेला.
श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे घटनेची चौकशी सोपविण्यात आली असून, चौकशी होईपर्यंत भिंगार कॅम्पचे प्रभारी अधिकाऱ्यासह काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आश्वासन अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिले. दरम्यान दीपक वाघस्करच्या मृत्यूप्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास एलसीबीचे पीआय संतोष मुटकुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्याची मागणी करण्याबाबतही शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणातील घटनाक्रम, त्यामागील परिस्थिती तसेच मृत्यूशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे.
चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिली.
भिंगार येथील गणेश विजर्सन मिरवणुकीत बुधवारी १५ मंडळे सहभागी झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक संपण्याअगोदर काही मिनिटे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. या गोंधळात शुक्लेश्वर मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक वाघस्कर रस्त्यावर कोसळले.
त्यानंतर पोलिस व कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर गणेश मंडळांनी मिरवणूक अर्धावर सोडली. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने भिंगारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी खासगी रुग्णालयात धाव घेत पोलिस प्रशासनावर थेट आरोप केले.
दीपक वाघस्कर प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. संपूर्ण प्रकरणाचा तपास बाहेरील अधिकाऱ्यामार्फत करावा, अशी मागणी केली. त्यानंतर भिंगार शहरात रात्री काही काळ रस्तारोको करण्यात आला. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ही आंदोलकांनी घेतला.
दरम्यान, गुरूवारी (दि.२४) सकाळी पुन्हा सम्राट तरूण मंडळ, जय बरजंग मंडळ, शुक्लेश्वर मंडळ व समर्थ युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीसह भिंगार शहरातील चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मयत दीपक वाघस्कर यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक सुरेश बनसोडे, निखील वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक करण कराळे, लोंढे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे, शिर्डीचे उपअधीक्षक अमोल भारती यांच्याबरोबर आमदार संग्राम जगताप यांच्या शिष्टमंडळाची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर प्रकरणावर तोडगा काढण्यात आला. अखेर २९ तासानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
इन कॅमेरा शवविच्छेदन
दीपक वाघस्कर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी (छत्रपती संभाजीनगर) येथे नेण्याची मागणी होत होती. मात्र, नातेवाईकांच्या निर्णयानंतर जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण काय ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे, डीवायएसपी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते.
पोलिसांचा खुलासा : लाठीचार्ज व मृत्यू प्रकरणाचा संबंध नाही
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिंगार परिसरात दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाल्यानंतर लाठीमाराच्या व्हीडिओवरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, ज्या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नव्हते. ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरविण्यासाठी त्यांच्या पायावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पाऊण तासांनी दीपक वाघस्कर जमिनीवर कोसळले आहेत. आता शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.