

नगर: जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर वादळी पावसाने हजेरी लावली. वादळात काही ठिकाणी घरांची पडझड, झाडे पडली. त्यामुळे अहिल्यानगरसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. अहिल्यानगर शहरात दुसर्या दिवशीही वीज गायब झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
या वादळी पावसाचा फटका पाच तालुक्यांतील 97 गावांना बसला असून, 587.14 हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 995 शेतकर्यांना बसला आहे. गुरुवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. (Latest Ahilyanagar News)
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी वार्यासह जिल्हाभर पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. बुधवारी सरासरी 11.9 मि.मी. पावसाची नोंद झाली. नगर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, पारनेर तालुक्यांत जोरदार वादळी पाऊस झाला.
या पावसाने तालुक्यांतील अनेक ठिकाणी झाडे पडली. घरांचे पत्रे उडाली. झाडी पडल्यामुळे महावितरणच्या तारांना अडथळे निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. या वादळी वार्याचा फटका नेवासा आणि शेवगाव तालुक्यांतील पिकांना आणि फळबागांना अधिक बसला आहे.
नगर तालुक्यातील 6, पाथर्डी तालुक्यातील 10, कर्जत तालुक्यातील 22, नेवासा तालुक्यातील 36 व शेवगाव तालुक्यातील 23 गावांना अधिक बसला आहे. या गावांतील कांदा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, टोमॅटो, मका, शेवगा, बाजरी, भुईमूग, आंबा, केळी आदी उन्हाळी पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
156 घरांची पडझड
वादळी पावसाने 156 घरांची पडझड झाली. यामध्ये नगर तालुक्यातील 4, जामखेड 21, कर्जत 17, नेवासे 87, पाथर्डी 25, संगमनेर 2 घरांचा समावेश आहे. नेवासे तालुक्यातील 10, जामखेड तालुक्यातील 5, नगर आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा 20 जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)
नगर : 21.4, पारनेर : 9.9, श्रीगोंदा : 21.2, कर्जत : 19, जामखेड : 7.2, शेवगाव : 24.9, पाथर्डी : 21.1, नेवासा : 10.9, राहुरी :2.8, संगमनेर : 4.2, अकोले : 2.1, कोपरगाव : 5.5, श्रीरामपूर : 0.5, राहाता : 4.1.
हेक्टरी नुकसान (कंसात शेतकरी संख्या)
नगर : 5.40 (16),
पाथर्डी : 19.4 (58),
कर्जत : 137.24 (300),
नेवासा : 261.8 (354).
शेवगाव : 163.3 (267).