

नगर : पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी शहर आणि परिसरात, तसेच जिल्ह्याच्या दक्षिण भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने रस्ते ओले झाले असून, काही ठिकाणी पाणी साचले. काही भागात रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती.
मे महिन्यात शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. त्यानंतर किरकोळ सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. 7 जूनला मृगाचा पाऊस येईल अशी आशा होती. परंतु पावसाने निराशा केली. गेल्या तीन-चार दिवसांपासून उकाडा वाढला आहे. अंगाची लाहीलाही सुरू आहे. बुधवारी वातावरणात उकाडा होता. रात्री साडेसात आठच्या दरम्यान, शहर आणि परिसरात जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. शहरातील इमारती आणि घरांच्या खिडक्यांचा आवाज झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसास प्रारंभ झाला. हलक्या स्वरूपाच्या पावसाने रस्ते ओले झाले. अचानक पडलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. सोसाट्याचा वारा सुरू होताच शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे काही काळ नागरिकांची गैरसोय झाली.
जामखेड तालुक्यात आज पुन्हा सर्वदूर पावसाने हजेरी लावली. तालुक्यांत काही भागात पेरण्या उरकल्या आहेत तर काही ठिकाणी वापसा होत नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. जामखेड तालुक्यात 300 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शेतकर्यांची बी-बियाणे व खते खरेदीसाठी कृषी केंद्रांत गर्दी केल्याचे दिसत आहे. जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
शेवगाव ः शहरासह तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, कांबी, चापडगाव, अंतरवाली आदी भागात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अचानक ढग जमा होऊन जोरदार वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कापूस, तूर, मूग, भुईमूग, बाजरी आदी पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शेवगाव-गेवराई मार्गावर सोनेसांगवी फाट्याजवळ वादळाने वृक्ष रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतून ठप्प झाली होती. लगतच्या ग्रामस्थानी जेसीबीच्या साह्याने वृक्ष हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
झाडे पडून घर, वाहनाचे नुकसान
सोनई परिसरात रात्री आठच्या सुमारास वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात अनेक ठिकाणी चाळीतील कांदा भिजला. झाडे व विजेचे खांब कोसळले. तारा तुटल्या. झाडे रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नव्या वांबोरी रोड परिसरासह एक-दोन ठिकाणी वाहनांवर झाडे पडली. कांगोणी येथे एका घरावर झाड पडल्याचे समजते.