

अहिल्यानगर: राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवला आहे. पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांनाही शेतात जाणे शक्य नाही. पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांनाही तिथे पोहचणे अवघड आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे शेतकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले. (Latest Ahilyanagar News)
जिल्हा सहकारी बँकेची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच क्यू आर कोडचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले होते.तर व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माधवराव कानवडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, आ. मोनीका राजळे, डॉ. सुजय विखे पाटील, विवेक कोल्हे, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, करण ससाणे, अरूण तनपुरे, अनुराधा नागवडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत्त 2700 कोटींची मदत दिलेली आहे. ही प्रक्रिया सुरूच असणार असल्याचे सांगून राजकारणाच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करायचे आहे.
धरण, तलावात पाणीसाठवण क्षमता वाढविणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढच्या सात वर्षात संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी मुळा धरणात 15, भंडारदऱ्यात 12 टीएमसी पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय अन्य प्रकल्पातूनही राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन काम करत आहे. त्यासाठी 70 हजार कोटींचा खर्च येणार आहे.
जिल्ह्यातील केटीवेअर हे 30 ते 40 वर्षापुर्वीचे आहेत. आज त्यांच्या दुरुस्तीची परिस्थिती दिसते आहे. मात्र दुरुस्ती करण्याऐवजी व्हर्टिकल्चर बॅरेजमध्ये त्याचे रुपांतर करण्याचा मानस आहे. यातून पाणीसाठवण क्षमता वाढून, सिंचन क्षेत्रही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना पुढच्या महिन्यात साकळाई योजनेचे भूमीपूजन करणार असल्याचेही मंत्री विखे पाटील म्हणाले.
सोसायट्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा
आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्षे साजरे करत आहोत. जिल्हा बँकेने सोसायट्यांच्या आर्थिक स्थेैर्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात. सोसायट्यांमधील संचालकांनीही बँकेच्या ठरावासाठी ज्याप्रमाणे ताकद लावतात, त्याप्रमाणे संस्थेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी ताकद लावावी, असेही कान टोचले.
दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँक ही पूर्वी कारखानदारांची ओळखली जात होती. मात्र आता बळीराजालाही कर्जपुरवठा होत असल्याने ही बँक शेतकऱ्यांची ओळखली जात असल्याचे उद्गार काढून पुढच्या टर्मलाही कर्डिले हेच चेअरमन असावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले.
कर्जमाफी गरजेचीच :आ. कर्डिले
आपत्ती व्यवस्थापनासाठी मंत्री विखे पाटील यांनी आपले एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेकडून 1 कोटी 11 लाखांची मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. यावेळी बँकेच्या कारभाराचा लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच शेतकरी कर्जमाफी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
कर्जमाफी करा... शेतकऱ्यांच्या घोषणा
मंत्री विखे पाटील यांचे भाषण सुरू असताना, काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी करा, अशी घोषणाबाजी केली. काहींनी आम्ही नियमीत कर्ज भरले आहे, आम्हाला अनुदान द्या, काहींनी सरसकट कर्जमाफीत आम्हालाही लाभ द्या, अशी मागणी केली. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी कर्जमाफीची मागणी रास्त असल्याचे सांगून शासन सर्वोतोपरी मदत करत असल्याचेही सांगितले.
आमच्या बँकेची चिंता करू नका, आम्ही समर्थ!
नगर : अहिल्यानगरच्या जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शी व स्वच्छ आहे. त्यामुळे वर्षभरात बँकेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. मात्र जाणता राजांना उगाचच नगरच्या बँकेची चिंता वाटते. तुम्ही तुमचीच चिंता करा, आम्ही आमची बँक सांभाळायला समर्थ आहोत, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मार्गदर्शन करत होते.यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, डॉ. सुजय विखे पाटील, अरूण तनपुरे, विवेक कोल्हे, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले आणि संचालक मंडळाने जिल्हा बँकेचा कारभार चांगला चालवला आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पिककर्ज दिले जात आहे. बचत गट, उद्योग धंद्यांनाही अर्थपुरवठा केला जातो आहे. अशी बँकेची चांगली परिस्थिती असतानाही बाहेरचे लोक उगाचच ढवळाढवळ करतात. मध्यंतरी ‘जाणता राजांना’ आपल्या बँकेची चिंता वाटली होती. मात्र त्यांनी आमच्या बँकेची चिंता करू नये, आम्ही समर्थ आहोत, तुम्ही तुमची चिंता करा, अशी टीका केली. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सभागृहाला ‘आपण आपली बंॅक सांभाळायला समर्थ आहोत की नाही’ असा सवाल करत सर्वांनी हात उंचावून ‘हो’ म्हणत त्यांना दुजोरा दिला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार : प्रा. राम शिंदे
मागे जिल्हा बँकेच्या अहवालात कधी आपला फोटो छापला नव्हता. त्यावेळी सत्ताही विरोधकांकडे होती. मात्र आता पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने शिवाजी कर्डिले हे बँकेचे अध्यक्ष बसले आहेत. कर्डिले भाजपाचे असतानाही आपला फोटो अहवालात नसल्याचे समजल्याने थोडे आश्चर्य वाटले. मात्र फोटो छापला म्हणून आपण मोठे होऊ किंवा फोटो नसल्यामुळे आपण छोटे होऊ, असा प्रकार नाही. त्याचे मला वाईट वाटत नाही. जिल्हा बँकेत आतापर्यंत कधी लक्ष घातले नाही, मात्र आगामी निवडणुकीत मी लक्ष घालणार आहे, असे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.