

वांबोरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे बीएबीएन हर्बल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बुधवारी काम करत असताना कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाला. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइक संतप्त झाले होते.
राहुरी-वांबोरी रस्त्यावर असलेल्या या कंपनीमध्ये भरत आसाराम माळवदे (वय 32, रा. मोरेवाडी, वांबोरी) हा सकाळी साडेनऊ वाजता कामावर आला. कंपनीत काम करत असताना तो यंत्रामध्ये ओढला गेला व जागीच मृत्युमुखी पडला.(Latest Ahilyanagar News)
ही माहिती गावात वाऱ्यासारखे पसरली व काही मिनिटांतच कंपनीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली. हा अपघात कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच घडल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी मृतदेहाला हात लावू न देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे सुमारे सहा तास मृतदेह जागेवरच पडून होता. या वेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहायक उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यासह कॉन्स्टेबल राहुल झिने पोलिस नाईक सुनील निकम आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सायंकाळी चार वाजता मृतदेहावर वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी कोंबडी पोलिस दूरक्षेत्रामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. भरत माळवदे अविवाहित होता. त्याच्या मागे आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.