

संगमनेर: पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. यामुळे रस्ता सोडून कंटेनर सरळ हॉटेलमध्ये घुसल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर रायतेवाडी फाट्याजवळ सोमवारी (दि.15) पहाटे घडली. या घटनेत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती संगमनेर शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. (Latest Ahilyanagar News)
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत दिव्यांग मिसळ आणि मासवडी हे हॉटेल आहे. रात्रीच्या वेळी हॉटेल बंद करून मालक दत्तात्रेय रंगनाथ मांडेकर हे आतमध्ये झोपले होते. दरम्यान सोमवारी पहाटे कंटेनर घेऊन चालक जात होता.
पहाटे साडेपाचच्या सुमारास कंटेनर चालकाला डूलकी लागली. यामुळे सुसाट वेगाने जाणाऱ्या या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने आवाजाने मालकाला जाग आली. या घटनेने मालक घाबरून गेले. यात हॉटेलचे शेजारील दुकानाचेही नुकसान झाले. संगमनेर शहर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.