

नेवासा: वोटचोरीच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 13) काँग्रेसचे नेते संभाजी माळवदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह विविध संघटनांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मोदी सरकार व निवडणूक आयोगाचा निषेध केला.
देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत व चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगलोर येथे पुराव्यासह आपले म्हणणे देशातील नागरिकांसमोर सादर केले. यात निवडणूक आयोग दोषी ठरविला आहे. (Latest Ahilyanagar News)
मागील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान चोरी होऊन भाजप सरकार सत्तेत बसविण्यात आले आहे. याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीकडून दिल्ली येथे मोठे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात इंडिया आघाडीच्या नेत्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले. या घटनेचे देशभर पडसाद उमटले. बुधवारी नेवासा तालुक्यात काँग्रेस कमिटी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय स्वाभिमानी संघ, प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडून नेवासा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मागील पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली.शहराध्यक्ष अंजुम पटेल, वंचित बहुजन आघाडीचे पोपट सरोदे, गणपत मोरे, प्रहारचे अध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनावेळी नेवाशाचे निवडणूक अधिकारी प्रशांत गोसावी यांच्याकडे मागील विधानसभा निवडणुकीचा झालेल्या मतदानासंदर्भात डेटा मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मोदी सरकार व निवडणूक आयोगाच्या निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख, सतीश तर्हाळ, गोरक्षनाथ काळे, संजय वाघमारे, संजय होडगर, बाबासाहेब मिसाळ, विजय गोरे, गोरख बर्वे आदी उपस्थित होते.