

नगर: जिल्ह्यातील गरजू व पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जीवनदायी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य सेवेला गती देणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना वेळेवर आर्थिक मदत मिळत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्ह्यातील तब्बल 3844 रुग्णांना सुमारे 31 कोटी 19 लाख 73 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे.
शासनाच्या विविध योजनांतून मदत न मिळालेल्या रुग्णांसाठी हा निधी खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे. हृदय, किडनी, यकृत, कर्करोग, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशूंचे आजार, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना उपचारासाठी नवी आशा मिळत आहे.
योजनेच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान झाली आहे. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रणाली आणि तातडीने अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया यामुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीय वाढला आहे. परिणामी अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत सहाय्य मिळत आहे.
तसेच सामाजिक दायित्व अंतर्गत विविध संस्था, रुग्णालये व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने निधी उभारणीस चालना मिळत आहे. विशेषतः बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी टाटा मेमोरियल सेंटर यांच्याशी समन्वय साधण्यात आल्याने गुणवत्तापूर्ण उपचार सहज उपलब्ध होत आहेत.राज्यात एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कक्षाचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी