

कर्जत: तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. त्यामधून मार्गक्रमण करून विद्यार्थी शाळेची वाट धरत आहेत.
सन 2022 मध्ये ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यावर कार्यवाही करीत ऑक्टोबर 2022 मध्ये तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. मात्र, हा आदेश प्रत्यक्षात राबविण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडल अधिकार्यांना काही स्थानिकांनी विरोध करीत काम थांबविले. तेव्हापासून महसूल प्रशासनाला हा रस्ता खुला करता आला नाही. (Latest Ahilyanagar News)
पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे प्रवास जीवघेणा ठरतो. मागील आठवड्यात पावसामुळे रस्त्यावर वेड्या-बाभळीच्या झाडांमुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. अनेक महिला शेतातून परतताना या झाडांमध्ये अडकून पडल्या होत्या. पाठीमागून ट्रॅक्टर आल्यामुळे त्यांना घरी जाता आले, अन्यथा काहींना पावसात आपले प्राण गमवावे लागले असते. मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
अनेक महिला खराब रस्त्यामुळे पाण्यात पडून जखमी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनाही अनेकदा सर्पदर्शन झाले. गुडघाभर पाण्यामधून या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जावे लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेड्या बाभळींचे साम्राज्य आहे. यामध्ये रानडुकर व वन्यप्राण्यांचे लपण झाले आहे. रात्री अंधारात रस्त्याने प्रवास करणे मोठे जखमीचे झाले आहे. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असूनही अद्यापि कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
..तर आम्ही अधिकारी कसे होणार?
आम्ही शाळेत गेलो नाही, तर अधिकारी कसे होणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना केला आहे. आम्हाला शाळेत जायचंय, पण रस्ता नसल्यामुळे आम्ही शाळा बुडवतोय. मग आम्ही अधिकारी कसे होणार? आम्हालाही तहसीलदार व्हायचे आहे. मात्र शाळाच बुडाली, तर अधिकारी कसे होणार, यामुळे आमचा रस्ता तत्काळ खुला करून द्या, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पाण्यात बसून घोषणाबाजी केली.