

सोनई: शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट अॅपबाबत राज्यभर उलटसुलट चर्चेल उधाण आले आहे. परंतु याबाबत कुठलेही ठोस कारवाई होताना दिसत नाही. याप्रकरणी त्वरित कारवाई होऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागमीने जोर धरला आहे.
याबाबत काँग्रेसचे संभाजी माळवदे , भाजपचे ऋषिकेश शेटे, वैभव शेटे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. ज़िल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानने सायबरकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. (Latest Ahilyanagar News)
श्रीमंदिर अॅप, उत्सव अॅप,देवधाम अॅप, वामा अॅप यांना देवस्थानाने परवानगी दिली होती. त्यानंतर वरील सर्व अॅपला देवस्थानने गेल्या 22 मे रोजी बंद करण्याचे पत्र दिले, अशी माहिती अर्जात दिली. हे सर्व सोडून अनेक अनधिकृत अॅप तीन वर्षांपासून चालू होते.
हे अनधिकृत अॅप कोण चालवत होते? यात कुणाचा सहभाग आहे? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. वामा अॅपला देवस्थानने 22 मे रोजी बंदचे पत्र देऊनही त्याने नंतर शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचा फोटो अॅपवर जाहिरातीसाठी वापरल्याचे बोलले जात आहे.
शनिशिंगणापूर ऑनलाइन पूजा विषय चांगलाच गाजत आहे. यात अनेकांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा घडत असतानाही देवस्थान कुठलीच भूमिका का घेत नाही? असा प्रश्न शनिभक्तांना पडला आहे.
पंधरा दिवसांपासून उदासी महाराज मठ, चौथरा परिसरात व्हिडिओ कॉल करणार्या देवस्थानच्या कर्मचार्यांना शनिमूर्तीचे छायाचित्र व व्हिडिओ काढू नये, या प्रकारची नोटीस बजावली. यासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे.
कर्मचारी, गावातील पूजा साहित्य, दुकानाशी संबंधित असलेले काही युवक, मंदिरात पूजा पाठ करणारे पुरोहित आदी सर्वच आता प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घेताना दिसत आहेत. तक्रार दाखल होऊन तीन आठवडे उलटले असले, तरीही त्यातून अजूनही काही बाहेर आले नाही. यातून काहींना पाठिशी घालण्याची भूमिका तर नाही ना? असा संशय शनी भक्तांना येत आहे.
‘त्या’ रॅकेटवर काय होणार कारवाई?
निवेदन, तक्रारी, फेसबुक, लाईव्ह, तसेच सोशल मीडियावर ऑनलाईन पूजा व त्यातून कोटवधींचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. घोटाळ्यात परिसरातीलच रॅकेट असल्याचा उल्लेख होत आहे. आता यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.