

श्रीरामपूर: घरकुल लाभार्थ्यांना एक गुंठा जागा नावावर करून द्या, या मागणीवरून बेलापुरातील ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. तू- तू- मैं- मैंवरुन सुरु झालेला गदारोळ हमरा- तुमरीसह थेट माइक ओढा- ओढीपर्यंत पोहोचला. दरम्यान, ग्रामसभेत गोंधळ निर्माण होताच, पोलिसांची ज्यादा कुमक मागविण्यात आली. तब्बल पाच तास सुरु असलेल्या ग्रामसभेतील या वादावर अखेर सुनील मुथा यांच्या मध्यस्थीनंतर अखेर पडदा पडला!
स्वातंत्र्यदिनी होणारी ग्रामसभा काल बेलापूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडली. सरपंच मीना साळवी अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी अहवाल वाचन केले.(Latest Ahilyanagar News)
जल जीवन पाणी पुरवठा योजनेच्या विषयावर चर्चा सुरु झाली असता, ग्रामसभेसाठी जल जीवन, पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी व ठेकेदार का उपस्थित नाहीत, असा सवाल माजी सरपंच भरत साळुंके, चंद्रकांत नाईक व बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी उपस्थित केला. जल जीवनचे पाईप रस्त्याच्या मधोमध टाकून, नळ जोडणी दिल्यामुळे भविष्यात नळ कनेक्शन्स गळती झाल्यास पुन्हा पक्के रस्ते खोदावे लागतील, असे मत साळुंके व नवले यांनी मांडले.
यावर अभिषेक खंडागळे म्हणाले की, लवकरचं ग्रामसभा घेऊन ग्रामस्थ, अधिकारी, पत्रकार, नागरिकांसह पाहणी दौरा करू असे ते म्हणाले. यावर तळ्याचा ठेका कोणाला दिला, नळ कनेक्शन्स जोडणीचा ठेका कोणाला दिला, काम कोण करते, अशी विचारणा चंद्रकांत नाईक यांनी केली असता, खंडागळे म्हणाले की, याबाबत लवकरचं बैठक बोलावली जाणार आहे. अनाधिकृत नळ जोडणी असेल ती, पैसे भरून घेऊन अधिकृत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना ग्रामसभेस उपस्थित राहणे बंधनकारक असताना, ते उपस्थित का नाहीत, असा सवाल सुधीर नवले यांनी केला.
नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र द्यावा, असे आवाहन खंडागळे यांनी केले असता, सुधीर नवले यांनी विचारले की, घनकचरा व्यवस्थापनाकरीता किती निधी आला, खर्च किती झाला, ग्रामपंचायतीने किती निधी दिला, याची माहिती ग्रामसभेला द्यावी, अशी मागणी केली.
घरकुल विषयावर माजी सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की, घरकुल योजनेचे निकष काय आहेत, किती घरकुल मंजूर झाले, घरकुलाला जागा किती देणार, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली असता, खंडागळे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनांनुसार अद्ययावत सोयीयुक्त घरकुल कॉलनी साकारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला अर्धा गुंठा जागा देणार आहे.
यावर साळवी म्हणाले की, घरकुल लाभार्थींकडून तुम्ही पैसे कशाचे मागता. तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे का, घरकुलवाला रुपयाही देणार नाही. त्यांच्या नावावर जागा करा. जागा मिळेल, तो त्या पद्धतीने घरकूल बांधील. असा मुद्दा साळवी यांनी मांडला. यावर माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उत्तर देत असताना, ग्रामस्थांसह सुधीर नवले, महेंद्र साळवी, भरत साळुंखे व शरद नवले यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. तुम्ही भ्रष्टाचार करता, असा थेट आरोप साळवी, नवले व साळुंखे यांनी केला.
प्रत्येक घरकुल लाभार्थ्याकडून 1 लाख 7 हजार रुपयाची मागणी कोणी केली? 1 हजार घरकुलाचे पैसे होतात किती? ही रक्कम कोणाला द्यायची? कुणाच्या खिशात पैसे जाणार? असा आरोप साळवी यांनी केला. यावर शरद नवले उत्तर देत असताना साळवी, सुधीर नवले, भरत साळुंखे व ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
आम्ही पैसे देणार नाही. आमच्या नावावर एक गुंठा जमिन सात-बारा उतार्यासह द्या, अशी जोरदार मागणी गायकड वस्ती येथील महिलांनी केली. यामुळे ग्रामसभेत गोंधळ सुरु झाला. दत्ता कुर्हे व चंदू नाईक म्हणाले की, बेलापूरला जागा मिळावी याकरता आम्हीदेखील प्रयत्न केले. केवळ आपण एकट्यानेच याचे श्रेय घेऊ नये, असे मत त्यांनी मांडले.
ग्रामसभा न संपताच, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न मिळताच गुंडाळली असा थेट आरोप सुधीर नवले, भरत साळुंके, महिंद्र साळवी व विक्रम नाईक यांनी केला. अभिषेक खंडागळे व शरद नवले यांनी, नियमानुसार ग्रामसभेचे कामकाज संपुष्टात आल्याचे जाहीर केले. यावेळी दोन्ही बाजूंनी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कामकाज पुन्हा सुरू करून, ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकाव्यात, अशी मागणी करीत सुधीर नवले, महेंद्र साळवी व साळुंके व विक्रम नाईक यांनी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळीनिषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बाहेर एक गट घोषणा देत असताना, ग्रामपंचायतीमध्ये शरद नवले, अभिषेक खंडागळे व कार्यकर्त्यांनीही दादागिरी खपून घेणार नाही, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
यामुळे वातावरण आणखी चिघळले. अखेर दुपारी 3 वाजता सुनील मुथा यांनी, शरद नवले, अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी लहारे यांच्याशी चर्चा करून, चर्चेतून तोडगा काढला. शेवटी वादावर पडदा पडला.
‘ते’ थेट एकमेकांच्या अंगावर धावले!
1 लाख 7 हजार रुपये या विषयांवरून वादावाद सुरु झाला. माईक ओढा-ओढी, माईक बंद पाडून, थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला, परंतू वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली. जास्त गोंधळ वाढल्यामुळे पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख फौज- फाट्यासह तत्काळ ग्रामसभास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंचे म्हणणे देशमुख यांनी ऐकले