

नगर: 1 जुलै 2025 पासून महावितरणच्या टीओडी स्मार्ट मिटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीजबिलात टीओडी सवलत लागू झाली आहे. अहिल्यानगर मंडलातील 77 हजार 903 ग्राहकांना 10 लाख 96 हजार रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.
महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (ढळाश ेष ऊरू) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरात घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरु झाला आहे. (Latest Ahilyanagar News)
टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जात आहे. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीज दराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला होता.
आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, सन 2027 मध्ये 85, सन 2028 व 29 मध्ये 90 पैसे तसेच सन 2030 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
दर अर्ध्या तासाला विजेचा वापर कळणार
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार असून, अचूक बिले मिळणार आहेत. घरातील विजेचा वापर दर अर्धा तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात.त्यामुळे टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
स्मार्ट टीओडी मीटर मोफत
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.