

पारनेर: भाग्योदय पतसंस्था व ठेवीदारांच्या ठेवी कोणी बुडवल्या, तसेच गोरेश्वर पतसंस्थेची बदनामी करून सभासद व ठेवीदारांना अडचणीत आणणार्यांना मतदार जागा दाखवून देणार असून, बाबा तांबे यांचा राजकीय डाव ‘गोरेश्वर’ला घातक असल्याचे मत गोरेश्वर सहकार पॅनेलचे उमेदवार प्रीती संकेत पानमंद यांनी व्यक्त केले आहे.
गोरेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत विरोधकांनी पॅनल करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेत राजकारण आल्यानंतर त्याची अवस्था काय होणार हे गेल्या काही वर्षांपासून सभासद मतदारांनी पाहिले आहे. तेच या निवडणुकीत मतदार थांबवणार आहे. (Latest Ahilyanagar News)
गोरेगाव येथे भाग्योदय पतसंस्था सुरू केली. त्यात अनेक गोरगरीब. कष्टकरी जनतेच्या ठेवी होत्या. त्या ठेवींचे काय झाले हे सर्व जनतेला माहित आहे. गोरेश्वर पतसंस्थेचा चढता आलेख त्यांना खुपला व त्यांनी संस्थेची बदनामी केली. संस्था व ठेवीदार यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यातून मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी ठेवी काढण्यास सुरुवात केल्याने संस्थेची तरलता संपली. मात्र, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने कर्ज जसे भरले जाते, तसे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या जातात. संस्थेने कोणतीही शाखा बंद केली नाही, तसेच ठेवीदारांना ठेवी दिल्या नाही असे अद्याप झाले नाही.
असे असताना चांगल्या चाललेल्या पतसंस्थेत विरोधी पॅनेलने कटकारस्थान रचून संस्था संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संस्था वाचवण्यासाठी मतदार पुढे येतील व संस्थापक बाजीराव पानमंद पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, हा विश्वास असल्याचे मंडळ प्रमुखांनी सांगितले आहे.
बनावट ऑडिओ क्लीपद्वारे दिशाभूल
निवडणूक सुरू असताना बनावट ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून पसरून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रकार केला जात आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसून संस्थेचा 27 वर्ष झालेला कारभार पारदर्शक झाला नसता, तर संस्थेची आजची आर्थिक स्थिती चांगली नसती.
चूक दुरुस्तीसाठी निवडणुकीला सामोरे
गोरेश्वर पतसंस्था सर्वांत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली संस्था असून, कुठलाही गैरप्रकार संस्थेत झालेला नाही. गत निवडणुकीत विरोधकांना संस्थेत सामावून घेतले ही चूक झाली. ती दुरुस्त करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे.
वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरडे राजकारण संस्थेत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. कौटुंबिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अशा त्रासाला आम्ही घाबरणार नसून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी व संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीची आमची लढाई आहे.
- प्रीती संकेत पानमंद