

राहुरी: तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे डेपो चौक हद्दीत बाजारपेठेत असलेले स्टेेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरांनी बुधवारी सकाळी गॅस कटरने कापून फोडले आणि त्यातील सुमारे 10 लाख 65 हजार 800 रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली. या चोरीने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भल्या सकाळी एटीएम फोडल्याचे समजताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. श्रीरामपूर विभागाचे जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सोमनाथ वाघचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (Latest Ahilyanagar News)
पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे तसेच एलसीबीचे अतुल लोटके, रमिराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड तसेच फॉरेन्सिकचे गणपत झरेकर, सोहेल सय्यद यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेत पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
त्यातील माहितीनुसार चोरट्यांनी गुहा फाटा परिसरातील एका दुकानातून गॅस कटर चोरल्याचे आणि राहुरी फॅक्टरी ते श्रीरामूपर रस्त्याने देवळाली प्रवरामध्ये पांढर्या मोटारीतून आल्याचे, तीन ते चार जणांनी मिळून एटीएम गॅस कटरने कापल्याचे दिसत आहे.
पहाटे 4 ते 5 या वेळेत ही चोरी झाली. याबाबत फायनान्सिअल सॉफ्टवेअर अॅण्ड सिस्टम प्रा. लि. कंपनीचे टीम लीडर नामदेव निवृत्ती दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी आशिष राजेंद्र पठारे यांच्या मालकीचे गॅस कटर चोरून, देवळाली प्रवरा येथील स्टेट बँकेचे एटीएम कापले व रक्कम चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी चोरट्यांनी येथील चार बंगले फोडले. येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चोरी केली. दोन दिवसांपूर्वी शेळ्या चोरणार्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.