

नगर: जिल्ह्यातील धरणांमध्ये 1 जूनपासून 20 ऑगस्टपर्यंत 53 हजार 285 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. ही आवक जिल्ह्यातील एकूण साठवण क्षमतेच्या 104 टक्के आहे. आजमितीस धरणांमध्ये 89.81 टक्के म्हणजे 45,890.64 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणे 60-65 टक्के भरताच नदीपात्रांमध्ये विसर्ग वेळोवेळी सोडण्यात आला आहे. त्यामुळे आजमितीस भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो, तर मुळा धरण 87.51 टक्के भरले आहे.
जिल्ह्यात भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा, सीना, खैरी, मांडओहळ, घाटशीळ, विसापूर आदी धरणांची एकूण क्षमता 51 हजार 93 दशलक्ष घनफूट आहे. यंदा जून महिन्यापासूनच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जुलै महिन्यामध्येच भंडारदरा, निळवंडे धरणे 87 टक्के, तर मुळा धरण 85 टक्क्यांच्या आसपास भरले होते. आढळा व सीना धरण जुलै महिन्यातच ओव्हर-फ्लो झाल्याची नोंद आहे. (Latest Ahilyanagar News)
20 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता धरणांतील पाणीसाठा 89.81 टक्के नोंदला गेला. गेल्या वर्षी हाच साठा 86.78 टक्के होता. सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसास प्रारंभ झाला आहे. आणखी दीड महिना पावसाचा बाकी आहे. मात्र, लाभक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालेले आहे.
जायकवाडी धरणाचा साठा 99 टीएमसी
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील धरणे सरासरी 88 टक्के भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतून गोदावरी नदीपात्रांत वेळोवेळी विसर्ग सोडण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणात आवक सुरू आहे. त्यामुळे बुधवारी (दि.20) सायंकाळी 6 वाजेपर्यंत जायकवाडी धरण 96.36 टक्के भरले असून, पाणीसाठा 99.06 टीएमसी इतका झाला आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 72.99 टीएमसी (95.21 टक्के) आहे.
धरणांतील आवक
भंडारदरा 16304, निळवंडे : 15033, मुळा : 18508, आढळा : 866, मांडओहळ :197, सीना :1446, खैरी : 288, विसापूर : 635.
पाणीसाठा
भंडारदरा : 10896, निळवंडे : 7179, मुळा : 22752,
आढळा : 1060, मांडओहळ : 349.25, खैरी : 350.39,
सीना : 2400, विसापूर : 896.