

SiddhiVinayak Siddhatek
जयवंत गिरमकर : अष्टविनायकांपैकी पाच पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, लेण्याद्री, ओझर. रायगड जिल्ह्यात महड, व पाली हे दोन, एक सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. सिद्धटेक हे गाव भीमा नदीकाठी वसलेले आहे.
सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे. मंदिर उत्तराभिमुख असून, मंदिरापुढील वेशीपासून मंदिरापर्यंत दगडी फरशीचा मार्ग आहे. छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती. मंदिराच्या पाठीमागील टेकडीवरून भीमा नदीचे विलोभनीय पवित्र रूप पाहावयास मिळते. मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते. मंदिराच्या गाभाऱ्यात सिद्धिविनायकाची स्वयंभू उजवीकडे झुकलेली सोंड असलेली शेंदूरलेपित मूर्ती आहे. मंदिराची व्यवस्था पिंपरी-चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे आहे.
श्री गणेशाच्या कृपेने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यात मग्न असताना विष्णू निद्रावस्थेत होते. त्या वेळी त्यांच्या कानातून मधू व कैठब नावाचे दोन राक्षस जन्माला आले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देऊन सृष्टीनिर्माणाचे कार्य बंद पाडले; मग ब्रह्मदेवाने विष्णुदेवास जागे केले आणि मधू व कैठब यांची माहिती दिली. भगवान विष्णू आणि मधू व कैठब यांच्यात घनघोर युद्ध झाले. पण, विष्णूंना त्या राक्षसांचा पराभव करता आला नाही; म्हणून ते शंकराकडे गेले. भगवान शंकरांनी विष्णुदेवाला षडाक्षरी मंत्र सांगून गणेशाची उपासना करावयास सांगितले. तेव्हा विष्णू सिद्धटेक येथे आले व त्यांनी 'श्री गणेशाय नमः' या षडाक्षरी मंत्राने श्री गजाननाची आराधना केली. तपश्चर्येने श्री गणेश प्रसन्न झाले. विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली. मधू व कैठब या दोन राक्षसांना ठार केले. ज्या ठिकाणी विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली व त्यांनी मधू व कैठब या राक्षसांचा पराभव केला, त्या ठिकाणी विष्णूंनी सिद्धिविनायकाची मूर्ती स्थापन केली. सिद्धी प्राप्त झालेले ठिकाण म्हणून या ठिकाणाला सिद्धटेक व सिद्धी देणाऱ्या गणेशाला सिद्धिविनायक नाव प्राप्त झाले.
पूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना भीमा नदीतून होडीने प्रवास करून मंदिराकडे जावे लागत होते. परंतु, आता शासनाने भीमा नदीवर पूल बांधल्यामुळे भक्तांची अडचण दूर झाली आहे. शिवाय शासनाने निधी उपलब्ध केल्यामुळे मंदिर परिसराचे व टेकडीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. टेकडीवरील भक्तनिवासातून परिसराचे विहंगम दृश्य गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करते. येथे हौशी भाविकभक्तांना नदीपात्रात बोटिंगची सोयही उपलब्ध आहे. मुंबई-पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेने दौंड जंक्शनला उतरल्यानंतर दौंडवरून सिद्धटेककडे जाण्यासाठी एस. टी. महामंडळाची बसव्यवस्था आहे. त्याशिवाय खासगी वाहनेही उपलब्ध आहेत. एस. टी. महामंडळाची बस पुणे-शिवाजीनगरहून पुणे ते जामखेड-कर्जत अशी बससेवा उपलब्ध आहे. शिवाय खासगी ट्रॅव्हलर्सकडून अष्टविनायक दर्शनाच्या वेगवेगळ्या सहलींचे आयोजन करण्यात येते.