

नगर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शिस्तप्रिय आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांनी वेळेचे महत्त्व आपल्या आचरणातून दाखवून दिले. भल्या पहाटे लोकांशी संवाद साधणारे आणि राज्यात कुठेही कार्यक्रम असला तरी वेळेवर पोहोचणारे ते नेते होते. त्यांच्या या ‘टायमिंगच्या गुणा’चा प्रत्येकाने अंगीकार करावा, हीच खरी दादांना श्रद्धांजी ठरेल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
राज्याचे दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा स्मरणार्थ भिस्तबाग महाल येथे प्रभाग क्रमाक एकच्या वतीने संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बारस्कर बोलत होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे मनपाचे गटनेते प्रकाश भागानगरे, प्रा. माणिकराव विधाते, अशोक गायकवाड, नगरसेवक अविनाश घुले, डॉ. सागर बोरुडे, संजय चोपडा, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण, गोरख पडोळे, वैभव जगताप, माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण, किरण बारस्कर, आशाताई निंबाळकर, संजय खामकर, ज्योती ढवण, सतीश ढवण, साधना बोरुडे, रोहिणी अंकुश, शिवाजी साळवे, अंजली आव्हाड, वैशाली राजधानी, भगवान काटे, गणेश बोरुडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले, अजितदादांच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी चांदबिबी काळातील रस्त्यांचा विकास करून शहराची खेड्याची ओळख पुसली. त्यामुळे शहरीकरणाचे रूप मिळाले. आज राज्यात जातिवादाचे रूप वाढत असताना त्याला ठामपणे विरोध करणारे नेतृत्व अजितदादा होते. अशी माणसे पुन्हा तयार होणे कठीण आहे, असे ते म्हणाले.
संगीतातून दादांना श्रद्धांजली
भिस्तबाग महाल येथे प्रभाग क्रमाक एकच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात गायक गिरीराज जाधव, सार्थक डावरे व नरेंद्र साळवे यांनी सादर केलेल्या संगीतमय गीतांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.
दादांमुळे अहिल्यानगरचा कायापालट: बारस्कर
अजितदादांनी विरोधकांच्या मनावर देखील राज्य केले. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेत विकासाची गती कायम ठेवली. अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा निधी दिला. त्यामुळे शहराचा कायापालट झाला आणि विकसित नगर म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या विचारांतून प्रेरणा व ऊर्जा घेऊन काम करू, अशी ग्वाही संपत बारस्कर यांनी दिली.