

नगर: दमदार पावसाअभावी ऐन पावसाळ्यामध्येच जिल्ह्यात पाणीटंचाई परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. आठ दिवसांत १० गावे आणि ४० वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने, या गावांसाठी नव्याने ११ टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या ११० गावे आणि ५७६ वाड्यांतील २ लाख २० हजार लोकसंख्येसाठी ११४ टँकर धावत आहे.
यंदा जून व ऑगस्ट या दोन महिन्यांत तुटीचा पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणी शंभर टक्के झाली. या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस ऑगस्टमध्ये झालाच नाही. त्यामुळे खरीप पिके अडचणीत आली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने, ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा, अहिल्यानगर, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, जामखेड व कर्जत या आठ तालुक्यांतील १०० गावे आणि ५३० वाड्यांतील जनतेसाठी १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील ४६, नगर तालुक्यातील १९ टँकरचा समावेश आहे.
ऑगस्ट महिना पूर्ण कोरडाठाक गेला असून, सप्टेंबर महिना निम्मा सरला तरीही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे भूजलपातळी आणखी खालावत असून, विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक पाझर तलाव, ओढे आदी जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत १० गावे आणि ४० वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. त्यामुळे ११ टँकर नव्याने सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील ८ टँकरचा समावेश आहे. आजमितीस सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा पाथर्डी तालुक्याला बसल्या असून, नगर, शेवगाव व कर्जत तालुक्यातही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसानेआणखी दडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.
टंचाईग्रस्त गावे व टँकर
अहिल्यानगर : १ गाव, १ वाडी (१)
पाथर्डी : ७ गावे, ३९ वाड्या (८)
शेवगाव : १ गाव, २ वाड्या (१)
जामखेड : १ गाव, ३ वाड्या (१)
तालुकानिहाय टँकर
संगमनेर : ६, नेवासा : १,
नगर :१९, पारनेर : ४,
पाथर्डी :५४, शेवगाव :१५,
कर्जत :११, जामखेड : ४
‘मुळा’च्या ३.७ टीएमसीचा समावेश : जिल्ह्यात ८८ टक्के पाणीसाठा
मुळा धरणातून आतापर्यंत ३ हजार ७२६ दलघफू तर भंडारदरा-निळवंडे धरणांतून १७ हजार ७२४ दलघफू असा एकूण २१ हजार ४५० दलघफू म्हणजे २१.४ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये सिंचन आणि नदीपात्रांत सोडण्यात आलेल्या पाण्याचा समावेश आहे. आजमितीस जिल्ह्यात ४५.१८ टीएमसी (८८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अकरा टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
यंदा जिल्हाभरात पावसाने ओढ दिली. मात्र, जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने भंडारदरा, निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले. मुळा धरणाचा पाणीसाठाही ९५ टक्क्यांच्या आसपास पोहोचला होता. भंडारदरा व निळवंडे धरण ९५ टक्के झाल्यानंतर प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकर्यांच्या मागणीनुसार पिकांसाठीही आवर्तन सोडण्यात आलेले आहे. सध्या ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो असल्याने खरीप पिकांना नुकतेच आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे.
१ जूनपासून भंडारदरा धरणातून ९ हजार ५६५ दलघफू म्हणजे जवळपास साडेनऊ टीएमसी तर निळवंडे धरणातून ८ हजार १५९ दलघफू म्हणजे आठ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले आहे. सोडण्यात आलेले काही पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले तर काही पाणी खरीप पिकांना सोडण्यातआलेले आहे.
मुळा धरणात जवळपास २५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा उपलब्ध झालेला होता. मात्र, मध्यंतरी खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांनी आवर्तनाची मागणी केली. त्यामुळे मुळा धरणातून खरीपासाठी आवर्तन सुरु आहे. आतापर्यंत मुळाच्या उजव्या कालव्यातून ३ हजार १४४ दलघफू म्हणजे तीन टीएमसी तर डाव्या कालव्यातून ५८२ दलघफू म्हणजे अर्धा टीएमसी असे एकूण ३.७ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. त्यामुळे आजमितीस मंगळवारी (दि.१५) सकाळी मुळा धरणात ८७.९२ टक्के म्हणजे २२ हजार ८६० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात सध्या तीन मोठी आणि सहा मध्यम प्रकल्पांत ८८.४० टक्के म्हणजे ४५ हजार १८२ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ९९.७८ टक्के म्हणजे ५० हजार ९९६ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
धरणनिहाय पाणीसाठ्याची टक्केवारी
भंडारदरा : १००
निळवंडे : १००
मुळा : ८७.९२
आढळा : १००
मांडओहळ : १७.५२
घाटशीळ : ९.१५
सीना : ४३.४६
खैरी : १५.९७
विसापूर : ७१.९२.