

अकोले: घरकुल लाभार्थ्यांसाठी नदीपात्रातील वाळूचे मोफत वाटप सुरू आहे. घरकुल लाभार्थ्यांवर वाळूसाठी कुठेही भटकंती करण्याची वेळ येवू नये, म्हणून राज्य शासनाने मोफत वाळू देण्याचा योग्य निर्णय घेतला, मात्र मोफत वाळूच्या संधीचा गैरफायदा घेत, घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर सर्रास वाळूची तस्करी सुरू आहे.
परिणामी, ‘लाभार्थी कमी अन् दलालच जास्त,’ अशी विरोधाभासी वस्तुस्थिती सध्या अकोले तालुक्यातील वाळू डेपोवर, याची देही, याची डोळा दिसत आहे. विशेष असे की, या गैरप्रकाराकडे महसूलचा कानाडोळा होताना दिसत आहे. (Latest Ahilyanagar News)
राज्य शासनामार्फत प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. घरकुल लाभाथ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलसह शासनस्तरावरून करण्यात आले, परंतू या योजनेचा लाभ घरकुल लाभार्थी न घेता, वाळू विकणारे दलालच सर्रास घेताना दिसत आहेत.
2024 ते 2025 या वर्षाकरिता अकोले तालुक्यात 13, 844 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली. बांधकामासाठी वेळेत वाळू उपलब्ध होत नसल्याने बहुतांश लाभार्थ्यांना घराचे काम करणे शक्य नव्हते. ज्यांचे घरकुल बांधकाम सुरू आहे, अशांना मात्र तब्बल दुप्पट दरामध्ये वाळू विकत घ्यावी लागत होती.
या प्रकाराची दखल घेत, शासनाने लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला, पण याचा गैरफायदा तालुक्यातील दलालांसह वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
कळस, वाघापर येथे वाळू डेपो सुरु
अकोले तालुक्यातील कळस व वाघापूर या दोन ठिकाणी वाळू डेपो सुरू आहेत. कळस डेपोवर 34 घरकुल लाभार्थ्यांना 170 ब्रास, तर वाघापूर डेपोवर 8 घरकुल लाभार्थ्यांना 40 ब्रास वाळूचे वाटप झाले आहे, अशी महसूल दप्तरी नोंद झाली आहे. अकोले तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी 76 हजार ब्रास वाळूची मागणी केली आहे. दरम्यान, लिंगदेव, रेडे व कुंभेफळ येथील वाळू डेपो प्रास्तावित आहेत.
बहुतांश लाभार्थी अनभिज्ञच..!
शासनामार्फत पाच ब्रास वाळू मोफत मिळते, हे अजुनही बहुतांश लाभार्थ्यांना माहिती नाही. यामुळे गैरफायदा घेत, वाळू तस्करांसह दलाल या योजनेत सक्रिय होत, मोठ्या प्रमाणात स्वतःचा फायदा करून घेत आहेत. घरकुल मंजूर लाभार्थ्यांना हेरुन, त्यांच्याकडून आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन लाभार्थ्यांना पैशाचे आमिष देत, किंवा लाभार्थ्यांना एक ब्रास देऊन, उर्रवरीत चार ब्रास वाळू दुसर्यांना विकून, दलाल पैसे कमवित असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
पाच ब्रास वाळू उचलून स्वतःचाच लाभ!
अनेक लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे, परंतू ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोफत वाळूची योजना अजुनही माहितच नसल्याने दलाल सक्रिय झाले आहेत. लाभार्थ्यांना वाळू डेपोवर नेवून, त्यांच्या स्वाक्षर्या घेत, लाभार्थी ‘हाच’ असे अधिकार्यांना भासवून, त्याच्या नावावर पाच ब्रास वाळू उचलून काही दलाल स्वतःचा लाभ करुन घेत आहेत.