

नगर: प्रदीर्घ विश्रांतीनंतर अहिल्यानगर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी झालेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाने रस्त्यांवरुन पाणी वाहिले गेले असून, सखल भागात पाणी साचले आहे.
जून महिन्यात 12 तारखेला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सरासरी 11.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी नगर शहरात देखील दमदार 21 मि.मी. पाऊस झाला होता. दुसर्या दिवशी 13 जूनला देखील 18.6 मिलिमीटरची नोंद झाली. (Latest Ahilyanagar News)
यावेळी नगर शहर व तालुक्यात सरासरी 16 मि.मी. पावसाचा समावेश होता. त्यानंतर कधीतरी नगर शहर आणि परिरसरात रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात दोन तीन दिवस सोडले तर आतापर्यंत शहर आणि परिसरात दमदार पावसाची नोंद झालेली नाही.
गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाचे वातावरण तयार होते. सोसाट्याचा वारा वाहतो आणि पाऊस गायब होतो. अशी परिस्थिती आहे. रविवारी नालेगाव महसूल मंडलात सरासरी 4.8, भिंगार मंडलात 2.8 मिलिमीटर पाऊस झाला. सोमवारी (दि.7) सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. साडेसहा वाजता मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. सावेडी, एमआयडीसी, नालेगाव शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने हजेरी लावली.
गेल्या 24 तासांत 5.4 मि.मी. नोंद
रविवारी ते सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 5.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक 24.2 मिलिमीटर पाऊस झाला. अकोले तालुक्यात 15.7, तर संगमनेर तालुक्यात 15.1, राहाता तालुक्यात सरासरी 7, श्रीरामपूर तालुक्यात 6.4, नेवासा तालुक्यात 6.9 तर राहुरी तालुक्यात 6.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाथर्डी वगळता इतर तालुक्यात सरासरी दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना किंचितसा दिलासा मिळाला आहे.