Rahuri Lucky Draw Fraud: राहुरीत लकीड्रॉच्या आमिषाने अनेकांना गंडा; सोलापूर, करमाळा येथील टोळी पसार

याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

​राहुरी: महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर व करमाळा येथून आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळीने एका नावाने लकी ड्रॉ सुरू करून हा गंडा घातला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

​याबाबत माहिती अशी की, ५ ते ६ महिन्यांपूर्वी सोलापूर व करमाळा येथून दोन महिला व काही पुरुषांची एक टोळी राहुरी शहरात आली होती. त्यांनी शहरात एका नावाने लकी ड्रॉ योजना सुरू केली. या योजनेमध्ये बक्षीस म्हणून चारचाकी कार, दुचाकी, लॅपटॉप, मोबाईल, सोने, गॅस शेगडी, कुट्टी मशीन, कुलर व शिलाई मशीन, अशा आकर्षक वस्तू ठेवल्या होत्या.

Fraud Case
Tree Plantation Drive: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा 10 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य; जिल्हा परिषदेकडून हरित जिल्ह्याच्या दिशेने मोठे पाऊल

या टोळीने राहुरी शहरासह तालुक्यातील टाकळीमिया, म्हैसगाव, ताहराबाद, कोंढवड, शिंगणापूर, शिलेगाव, तांदुळवाडी आदी गावांतील सुमारे ४०० महिला व पुरुषांना ५०० रुपये फी घेऊन या लकी ड्रॉचे सभासद करून घेतले. शहरात असलेल्या एका लॉन्समध्ये प्रत्येक शनिवारी हा लकी ड्रॉ काढला जात असे. त्यावेळी सर्व सभासदांकडून नियमित साप्ताहिक हप्ता भरून घेतला जात होता.

​सुमारे १० ते १२ हप्ते होईपर्यंत या टोळीने काही किरकोळ बक्षिसे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, तुम्हाला चारचाकी कार व मोटारसायकल सारखे मोठे बक्षीस काढून देतो, असे आमिष दाखवून अनेक जणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करून घेतले. अशा प्रकारे संपूर्ण तालुक्यातून लाखो रुपये गोळा केल्यानंतर सदर टोळी लकी ड्रॉ बंद करून रातोरात पसार झाली.

​आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित नागरिकांनी संशयितांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.

अखेर या फसवणुकीप्रकरणी विलास खडके, नंदा अडागळे, लता मोरे, प्रसाद अडागळे, दया मोरे, कमल जगधने, मनिषा जगधने, मथुरा जगधने, शोभा अडागळे, भारती जगधने, कृष्णा दळवी, मंदाबाई खवळे, अर्चना जगधने, प्रकाश सोनवणे, स्वाती निमसे, भानुदास खवळे, अलका मोरे, सोमनाथ क्षिरसागर, सुरेश कांबळे, अर्चना शिंदे, अमिन पठाण, जिजाबाई निमसे आदींनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Fraud Case
Onion Storage Loss: कांद्याने पुन्हा दिला शेतकऱ्यांना धोका; चाळीतच सडला हजारो टन कांदा, आर्थिक संकट गडद

असा रचला डाव

दोन महिला व काही पुरुषांच्या या टोळीने राहुरीत तळ ठोकला. त्यांनी आकर्षक लकी ड्रॉ योजना सुरू केली. यात मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी असल्याचे जाहीर केले. या आमिषाला बळी पडून शहरासह अनेक गावातील ४०० हून अधिक महिला व पुरुषांनी ५०० रुपये फी भरून याचे सदस्यत्व घेतले.

५०-५० हजार उकळले

लोकांचा विश्वास बसल्याचे पाहून टोळीने आपला खरा डाव सुरू केला. तुम्हाला चारचाकी कार आणि मोटारसायकल सारखे मोठे बक्षीस काढून देतो, असे खोटे आश्वासन देऊन अनेकांकडून प्रत्येकी ५०-५० हजार रुपये गोळा केले. पैसे पदरात पडताच ही टोळी लकी ड्रॉ गुंडाळून रातोरात पसार झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news