

Constitution Bhavan funding
नगर: अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 5 कोटी रूपये व राज्य शासन 10 कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली. अहिल्यानगरात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याचा व विचारांचा खर्या अर्थाने गौरव असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक नियमितपणे प्रेरणा देणारे ठरेल. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान डॉ. आंबेडकरांनी भारताला दिले. त्यांनी गरीब, वंचित व शोषित घटकांना समानतेचा हक्क बहाल केला असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
डॉ. आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याकडे पाहताना त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण सतत होत राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावर्षी शासनाने सामाजिक न्याय विभागासाठी 25 हजार कोटींची भरीव तरतूद केली आहे.
इंदू मिल येथील भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महापुरुषांच्या विचारांवर आधारित राज्यकारभाराची वाटचाल सुरू असून, नव्या पिढीने बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आपल्या जीवनात सामाजिक समतेची दिशा निश्चितच स्वीकारावी, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यात शाहू, फुले व आंबेडकर याचा पुरोगामी वारसा पुढे न्यायचा आहे. त्यामुळे सर्वाच्या कल्याणासाठी समता, बंधत्वताची भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. नवीन पिढी डॉ. आंबेडकर यांची प्रेरणा घेऊनच वाटचाल करील. गरीब, वंचित लोकांना शिक्षणाचा अधिकार देऊन पुढे जाण्याचा मंत्र दिला. डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार पुढे जाण्याचा निर्धार आपण करु, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
कार्यक्रमापूर्वी, गायक आनंद शिंदे यांच्या संगीत पथकाने आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी प्रा. जोगेंद्र कवाडे, भन्ते राहूल बोधी, पुतळा समितीचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, अशोक गायकवाड, अजय साळवे, नाथाभाऊ आल्हाट, सुरेश बनसोडे, महानगरपालिका जल अभियंता परिमल निकम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले.
संविधानाने देशाला एकसंघ ठेवले
जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलेले जाणार नाही. बाबासाहेबांच्या समता व न्याय या तत्त्वांवर आधारलेले संविधान भारताला एकसंघ ठेवण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी संविधानामुळेच प्राप्त झाली आहे. भारतीय सामाजिक चळवळीला बळ देणारे नेतृत्व डॉ. आंबेडकर यांनी दिल्याचे पवार म्हणाले.
पुतळ्याची वैशिष्ट्ये
नवी दिल्ली येथील नव्या संसद भवन अर्थात सेंट्रल व्हिस्टा या वास्तूच्या प्रेरणेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक
15 फूट उंचीचा चौथारा असून त्यावर 10 फूट
उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कास्य
धातूपासून साकारलेला पुतळा
पुतळ्याचे एकूण वजन 950 किलोग्रॅम
पुतळ्याच्या मागील भिंतीवर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांची एलईडी स्वरूपातील स्वाक्षरी
साक्षरतेचे प्रतीक म्हणून लेखणीचे शिल्प पुतळ्या समोरील बाजूस
सर्वोच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
पुतळ्याच्या धर्तीवर पूर्णाकृती पुतळा
पुतळा निर्मितीसाठी 16 लाख 79 हजारांचा खर्च
पुतळा सुशोभीकरणासाठी 66 लाख रूपये खर्च
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजासाठी जीवन समर्पित केले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात 1928 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. अहिल्यानगर येथील निवासात असतानाच त्यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहिला. लंडन गोलमेज परिषदेतून आल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने त्यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. बाबासाहेबांचे अहिल्यानगर जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते होते.
- राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री
मार्केट यार्ड येथे साकार होत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानाला कधीही धक्का लागणार नाही, ते चिरकाल टिकणारे आहे. अहिल्यानगर येथे संविधान भवन उभे राहावे, अशी अपेक्षा.
- संग्राम जगताप, आमदार