

जामखेड: जामखेड शहरातील महावितरण कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि डिजिटल पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महावितरण जामखेड शहर या नावाने अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप केला आहे. त्या माध्यमातून शहरातील विजेशी संबंधित सर्व माहिती थेट नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचवली जात आहे.
वीज गेली की लगेच तांत्रिक कारणांची माहिती मिळेल थेट मोबाईलवर! पूर्वी वीज गेल्यानंतर नागरिक संभ्रमात राहत असत. लाईन फॉल्ट आहे का?, ट्रान्सफॉर्मर बिघडला आहे का?, देखभाल काम चालू आहे का? याची कोणतीही खात्रीशीर माहिती मिळत नसे. (Latest Ahilyanagar News)
अनेकदा नागरिकांनी वारंवार कार्यालयात फोन करण्याचा प्रयत्न केला, पण कॉल जाऊ न शकल्याने अस्वस्थता वाढत होती. याच पार्श्वभूमीवर महावितरणने नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे.
मोबाईलवर आता वीज गेल्याचे कारण (उदा. लाईन फॉल्ट, ट्रान्सफॉर्मर बिघाड), वीज कधीपर्यंत येईल, याचा अंदाज, नियोजित देखभाल व वीजबंदीची पूर्वसूचना, तातडीच्या दुरुस्ती कामांची माहिती, नागरिकांसाठी सतर्कता व सुरक्षिततेचे संदेश तसेच हा ग्रुप ब्रॉड कॉस्ट (एकतर्फी माहिती) स्वरूपात असणार आहे. फक्त अधिकृत महावितरण कर्मचारीच माहिती पोस्ट करू शकतील. त्यामुळे गरज नसलेली चर्चा, गैरसमज व अफवांना आळा बसेल. ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी महावितरण जामखेड कार्यालयाशी संपर्क साधावा.
दरम्यान, नागरिकांनी या ग्रुपमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी माहिती मिळवावी. कार्यालयात कॉल्सचा भार कमी व्हावा, नागरिकांना अचूक व वेळेवर अपडेट्स मिळावेत, हाच आमचा हेतू आहे, असे उपकार्यकारी अभियंता काटकधोंड यांनी सांगितले.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
या उपक्रमास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, आता विजे संदर्भातील तांत्रिक माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळत असल्याने नागरिकांची चिंता कमी झाली आहे. विशेषतः व्यापारी वर्ग, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.