

नगर: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्यादेखील वाढू लागली आहे. पारनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत 3 गावे आणि 28 वाड्यांत टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने या तालुक्यात नव्याने पाच टँकर सुरु झाले. त्यामुळे टँकरची संख्या 13 वर गेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 34 गावे आणि 162 वाड्यांतील 64 हजार 586 जनतेचा घसा कोरडा पडला असून, 30 टँकरव्दारे त्यांची तहान भागवली जात आहे.
गेल्या पावसाळ्यात 131 टक्के पावसाची नोंद झाली. नदी, नाले वाहिले गेले. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत भूजलपातळी चांगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून अकोले तालुक्यात टँकर सुरु आहे. त्यानंतर संगमनेर, नगर व पारनेर तालुक्यांतील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली.
सध्या चार तालुक्यांत टँकर सुरु आहेत. येत्या काही दिवसांत उन्हामुळे पाणीस्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत टँकर सुरु राहतील हे ग्रहीत धरुन जिल्हा प्रशासनाने टँकरची निविदा प्रसिध्द केली. आठ निविदा दाखल झालेल्या आहेत.
दरम्यान, 27 एप्रिलपर्यंत पारनेर तालुक्यात 9 गावे आणि 80 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने 20 हजार 500 जनतेसाठी 8 टँकर धावत होते. या तालुक्यात आणखी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या 12 गावे आणि 108 वाड्यांतील 30 हजार 143 जनतेसाठी 13 टँकर धावत आहेत. नगर तालुक्यात गुरुवारी 3 गावे आणि 9 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पारनेर तालुक्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील 14 गावे आणि 27 वाड्यांत टंचाई असून, 10 टँकरव्दारे 22 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. नगर तालुक्यातील 6 गावे आणि 21 वाड्यांतील 11 हजार 110 ोकसंख्येला 6 टँकरने तर अकोले तालुक्यातील 2 गावे आणि 6 वाड्यांतील 1 हजार 171 लोकसंख्येला एका टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 81 टँकर कमी
गेल्या वर्षी याच दिवशी संगमनेर, अकोले, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव,कर्जत, जामखेड या आठ तालुक्यांना 111 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु होता. यामध्ये सर्वाधिक पारनेर तालुक्यातील 34 टँकरचा समावेश होता. यंदा चार तालुक्यांना टंचाई झळा बसल्या असून, 30 टँकर धावत आहेत.