

नगर: रसायनिक क्रीमपासून बनावट दूधनिर्मिती केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकास अटक केली. पोलिस तपासात राहुरी तालुक्यातील बड्या हस्तींची नावे निष्पन्न झाली. बनावट दुधाच्या गुन्ह्यात आरोपींची संख्या 41 झाली असून, त्यातील 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रामचंद्र उर्फ राजू चिंतामण शेटे (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी), सर्जेराव मोहन म्हसे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) यांना संशयित आरोपी केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी छापा टाकून बनावट दूध तयार करण्याचा धंदा उघडकीस आणला. पॅराफिन (मिनरल ऑइल), 9.5 नावाचे केमिकल, मिल्क क्रिम व पाणी यांचे एकत्रित मिश्रण करून मशिनद्वारे मिक्स करून घातक क्रिमची निर्मिती केली जाते. त्या एक लिटर क्रिमपासून सुमारे 20 लिटर दूध तयार करून ते विक्री केले जात असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले.
याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात समीर कमरूद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. बनावट दुधाच्या गुन्ह्यात राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यासह बीड, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 31 जणांचा सहभाग निष्पन्न झाले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत.
बनावट दुधाचे केंद्रबिंदू राहुरी तालुक्यातील देवळालीप्रवरा असल्याचे तपासात समोर आले होते. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत असताना आणखी दहा आरोपींची नावे निष्पन्न झाली. गेल्या आठवड्यात संतोष धसाळ याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले. तपसात पोलिसांनी धसाळच्या गोठ्यात कामाला असलेला अक्षय निकम याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर गोठ्यात केलेले बनावट दूध नेमके कोठे जात होते, याचा पोलिसांनी शोध घेतला. तर, धसाळ याच्या गोठ्यातून बनावट दूध रामचंद्र उर्फ राजू चिंतामण शेटे (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी), सर्जेराव मोहन म्हसे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) यांच्या दूध डेअरीवर जात असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजू शेटे व सर्जेराव म्हसे यांना संशयित आरोपी केले असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आतापर्यंतचे अटक आरोपी
समीर कमरूद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी), रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद), किरणकुमार भास्कर रोहकले (रा. श्रीरामपूर) व अर्जुन हरिश्चंद्र जगदाळे (रा. नेवासा), संतोष माधव धसाळ (रा. तांदूळवाडी, ता. राहुरी), अक्षय मधुकर निकम (रा. आरडगाव, ता. राहुरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.