

नगर: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने मुळा, भंडारदरा, निळवंडे आणि आढळा धरणांत पाण्याची आवक होऊन ही धरणे सरासरी ४५ टक्क्यांच्या वर भरली गेली आहेत.
सध्या नऊ धरणांत ४४.३० टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त होतो. मात्र, तो पडत नसल्यामुळे बळिराजा चिंतातूर झाला आहे.
जून महिन्यात ३९ टक्के तुटीचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात खोळंबली. तुटीच्या पावसामुळे धरणांत नवीन आवक झाली नाही. त्यामुळे ३० जूनअखेर धरणांत ११ हजार ९०१ दलघफू म्हणजे एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत २३ टक्के इतकाच अल्प पाणीसाठा उपलब्ध होता.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अकोले, संगमनेर आणि पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवस कमी -अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. ३० जून ते आतापर्यंत सरासरी १० हजार ७४१ दलघफू इतकी वाढ होऊन आजमितीस धरणांत २२ हजार ६४१.७२ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला होता. तसेच मे महिन्यातदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सीना, विसापूर आदी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षी या कालावधीत धरणांतील पाणीसाठा ३८ हजार ६३७ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
आतापर्यंत ५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पाणलोट तसेच लाभक्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पेरणी पावसाअभावी वाया जाण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे बळिराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करु लागला आहे.