

राहुरी: राहुरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. रात्री-अपरात्री वाहनांमधून मोकाट कुत्रे राहुरी परिसरात आणून सोडली जात आहेत. गावा-गावात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या पाहता राहुरी परिसरात मागिल महिनाभरात 715 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून मिळाली.
कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया राबवावी अशी मागणी होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, राहुरी परिसराला मोकाट कुत्र्यांनी वेढले असल्याची गावा-गावात चित्र आहे. श्वानदंश झाल्यानंतर शासकीय रुग्णालयांमध्ये दैनंदिन इंजेक्शन घेण्यासाठी येणार्यांची संख्या वाढतच आहे. (Latest Ahilyanagar News)
राहुरी येथील ग्रामिण परिसरातून माहिती घेतली असता गुहा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मे महिन्यामध्ये सर्वाधिक 113 जणांनी श्वानदंश झाल्यानंतर उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे.
टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्रातही 53 जणांना श्वानदंश झाल्यानंतर रेबीज लस घेण्याची वेळ आली. त्यासह देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्र 45, मांजरी प्राथमिक आरोग्य केंद्र 43, टाकळीमिया प्राथमिक आरोग्य कंद्र 53, उंबरे केंद्र 33, बारागाव नांदूर केंद्र 22 असे एकूण ग्रामिण पट्यातच महिन्यात एकूण 307 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर राहुरी शहरातही मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सर्वसामान्यांना त्रस्त करणारा ठरत आहे. शहरामध्ये मागिल मे महिन्यात एकूण 257 जणांनी श्वानदंश झाल्यानंतर उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे.
वांबोरी व ताहाराबाद ग्रामिण रुग्णालयातही श्वानदंश झालेल्या अनुक्रमे 78 व 73 इतक्या जणांनी उपचार घेतले आहे. श्वान चावल्यास रेबीज सारखा जीवघेणा आजार जडण्याची भिती असते. परिणामी श्वानदंश झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयात उपचार घेतले जातात.
रेबीजचा जीवघेणा धोका
श्वानदंश झाल्यानंतर रेबीज होण्याचा धोका वाढतो. उष्ण रक्तवर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येणारा घातक विषाणूजन्य आजार म्हणून रेबीज ओळखला जातो. श्वानांपासून सर्वाधिक प्रमाणात मानवी हाणी होण्यास रेबीज कारणीभूत ठरतो. रेबीज झालेले श्वानाने मानवास चावा घेतल्यास किंवा राळेच्या संपर्कात आल्यानंतर विषाणुचा प्रसार होतो. हा रोग झुनॅटिक म्हणजेच प्राण्यांपासून मानवाला होत असल्याने श्वानदंश घातक ठरतोय.
निर्बिजीकरण मोहिम दिसेनाच
कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने मानवी हल्ले वाढले आहे. परिणामी कुत्र्यांचे निर्बिजीकरण होऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे. परंतु प्रशासनाला यासंबंधी काहीही घेणे नसल्याचे चित्र आहे.
कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ले वाढले
ग्रामिण परिसर तसेच शहरामध्ये उघड्यावर टाकली जाणारी घाण तसेच सांडपाण्यामुळे मोकाट कुत्रे संचार करीत असतात. त्यामुळेही आजारपण वाढत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या पाहता अनेक ठिकाणी टोळीने हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक प्रमाणात ज्येष्ट नागरीकांना श्वान दंश झाल्याची माहिती रुग्णालयातील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शाळेत जाणारी लहान मुले, शेतामध्ये काम करणारे मजूर, महिला, तरुणी व रस्त्यावरून पायी जाणार्या सर्वसामान्यांना श्वान दंश होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
कोणालाही श्वान दंश झाल्यानंतर जखमेला ब्लेड मारणे किंवा इतर घरगूती उपाय करू नये. जखम तत्काळ स्वच्छ पाणी व साबणाने धुवून काढल्यानंतर अधिक वेळ वाया न घालवता लगतचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात उपचार घेण्यासाठी जावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठिकाणी रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध असतात.
- दीपाली गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी