

राहुरी: राहुरी नगरपरिषदेला शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी दिला होता. संबंधित निधीबाबत शासनाने शुद्धीपत्रक काढत सदरचा निधी कर्जत नगरपंचायतीला वर्ग केल्याचे पत्र दाखवत माजी प्राजक्त तनपुरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. राज्यकर्त्यांसह राहुरीचे विद्यमान आमदार यांनी राहुरीकरांचा विकास न करण्याचा विडा घेतल्यानेच निधी दुसरीकडे वळविला जात असल्याची टीका तनपुरे यांनी केली.
तनपुरे यांनी हातात कागद घेत शासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. शासनाकडून विविध नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी निधी दिला जातो. त्यानुसार शासनाकडून 50 लक्ष रुपयांचा निधी राहुरी नगरपरिषदेला मिळाला होता. निधी मिळाल्यानंतर शहरातील विविध समस्यांचे निराकरण झाले असते.(Latest Ahilyanagar News)
परंतु संबंधित निधीकडे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांनी लक्ष दिलेच नाही. त्यामुळे सदरचा निधी शासनाकडून 8 मे 2025 रोजी शुद्धीपत्रक काढत कर्जत नगरपंचायतसाठी दिला जात असल्याचे जाहीर करण्यात आले. कर्जत (जि.अहिल्यानगर) येथील नगरपंचायतीला निधी देण्यासाठी शासनाने वेगळा निधी देणे गरजेचे होते.
परंतु राहुरी नगरपरिषदेला मंजूर झालेला निधी कर्जत नगरपंचायतीला दिला जात असल्याने राज्यकर्त्यांसह विद्यमान आमदारांची राहुरीकरांबाबत असलेली मनःस्थिती स्पष्ट होत आहे. राज्य शासन व राहुरीचे लोकप्रतिनिधी राहुरीकरांचा विकास होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पाहून दुःख वाटत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. राहुरी शहरातील नागरीकांच्या विकासकामांबाबत राज्य शासनाचा व विद्यमान आमदारांचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा आरोप तनपुरे यांनी केला.
चार महिने उलटूनही निविदा नाही
राहुरी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात अचानकपणे दाखल झालेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यानी मंजूर कामांची माहिती घेतली. निधी मंजूर होऊनही 4 महिन्यांपासून निविदा प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याची धक्कादायक माहिती पालिका अधिकार्यांनी दिली. राहुरी नगरपरिषदेचे अधिकारी राजकीय दबावापोटी राहुरी परिसराला विकासापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला.