अकोले : गत आठवड्यापासून राजूरला काविळीने घेरले आहे. आजमितीला दीडशे जणांना कावीळची बाधा झाली असून मुंबई, पुणे, संगमनेर, नाशिकमधील विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान वीस वर्षाच्या मुलीचा पहिला बळी कावीळने घेतला. सरकारी दवाखान्यासोबतच खासगी रुग्णालयेही कावीळच्या रुग्णांनी फुल झाल्याचे चित्र आहे.
प्रियंका हरिभाऊ शेंडे असे काविळने मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. त्या निषेधार्थ गावकर्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत कारभाराचा निषेध नोंदविला. सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दुषित पाण्यामुळे राजूर गावात कावीळची साथ पसरली आहे. जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण वायफासे यांनी गावच्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली, तेव्हा गाळ साठल्याचे आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या अधिकार्यांची कानउघडणी करत दोन दिवसांत स्वच्छ पाणी पुरवठ्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे, डॉ.प्रशांत शेलार, सुपरवायझर मोहन पथवे, आरोग्य सेवक अमित झांबरे, धोडीराम शेळके यांनी आरोग्य सेवक, आशासेविका, गटप्रवर्तकांच्या 40 टीमद्वारे गावात सर्व्हे करत घरोघरी मेडिक्लोर बाटल्या आणि जनजागृती करणारे पत्रक वाटप केले. लहान मुलांनाही कावीळची बाधा झाल्याने पालकांत चिंता निर्माण झाली आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिकार्यांनी राजीनामे देण्याची मागणी निलेश साकुरे, सतोष मुतडक, अनत घाणेरड्या, अक्षय देशमुख, गंगाराम धिदळे, सचिन देशमुखांसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे विस्तार अधिकारी दिलिप गायकवाड यांच्याकडे केली.
आ.डॉ.किरण लहामटे यांनी काविळ बाधित रुग्णांची राजूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तेथूनच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधला. रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड व्यवस्था,डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच औषधसाठा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. गावाला शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने तातडीने प्रयत्न करावे, अन्यथा पाणी पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा आ.लहामटे यांनी दिला.