

गोरख शेजूळ
नगर : चोर्या, हाणामार्या, अपहरण, विनयभंग, मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे. गत 140 दिवसांत 18 वर्षाखालील 114 अल्पवयीन मुलं राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेपत्त्ता 114 मध्ये 10 मुले, तर तब्बल 104 मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे. बेपत्ता मुलींचे पुढे काय झाले, याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Ahilyanagar News Update)
राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते. तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलिस अधिक्षकांना शहरासह 14 तालुक्यांतील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते. गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहात्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणार्या अल्पवयीन मुलामुलींची संख्या अस्वस्थता वाढविणारी आहे.
घरगुती भांडणे, आर्थिक विवंचना, आजारपण, विकृती, कौटुंबिक कलह, अभ्यासाचे टेंशन, प्रेमप्रकरण, कुटुंबांकडून संभाव्य विरोध या कारणांमुळे मुले, मुली घर सोडून जात असल्याची माहिती समोर येत आहे. पाल्यांची अशाप्रकारे मिसिंग झाल्याची नोंद पालक पोलिसांत देत आहेत.
पोलिस क्राईम रेव्ह्यूअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, 1 जानेवारी ते 27 मे या साधारणतः पाच महिन्यांच्या कालावधीत 15 ते 24 वयोगटातील 782 जण बेपत्ता झाले आहेत. यात तब्बल 617 मुली, महिलांचा समावेश असून, 165 मुलांची, युवकांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार संबंधित 140 दिवसांमध्ये दररोज पाच मुली, महिला घर सोडून निघून गेल्याचे पुढे आले आहे. यातील अनेकांना शोधून त्यांच्या पालकांकडे सूपूर्द केल्याचेही समजते. तर काहीजण अजुनही बेपत्ता असल्याचेही कळते. त्यांचे पुढे काय झाले, याची माहिती समजू शकलेली नाही.
घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या मिसींगची पाच महिन्यांत अल्पवयीन मुला-मुलींची 114, तर यांच्यासह 24 वयोगटापर्यंत 782 खबरी दाखल आहेत. यामध्ये अपहरण किंवा फसू लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यांबाबतचा समावेश नाही. ही संख्या देखील पालकांची चिंता वाढविणारी आहे.