

नगर: गेल्या 24 तासांत पावसाने शेवगाव, पाथर्डी, नेवासा, नगर व जामखेड तालुक्यांना झोडपून काढले. शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 23.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, खरीप पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, दुसर्या दिवशी शुक्रवारी नगर शहर आणि परिसरात रिमझिम झाली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाची नोंद झाली. या पावसाने खरीप पिकांना किंचितसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गणरायाचे आगमन झाल्यानंतर दुसर्याच दिवशी गुरुवारी पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. (Latest Ahilyanagar News)
गुरुवारी सकाळी दहा ते शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. सरासरी 71.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाथर्डी तालुक्यात देखील 68.4 मिलिमीटर पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील 6 गावे आणि 43 वाड्यांसाठी टँकर सुरु आहेत. या पावसामुळे पाणीपातळी वाढून पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता आहे.
नेवासा तालुक्यात 46.9, नगर तालुक्यात 33.4 तरजामखेड तालुक्यात 28.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नगर तालुक्यातील दोन, शेवगाव तालुक्यातील सात तर पाथर्डी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या जोरदार पावसाने या तालुक्यांत भूजलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. उशिरा का होईना दमदार पाऊस झाल्यामुळे पिकांच्या वाढीस मदत होणार आहे.
पारनेर तालुक्यात 13 मिलिमीटर, श्रीगोंदा 11.1, कर्जत 12.4, राहुरीत 13.6, संगमनेर 3.4, अकोले 0.4, कोपरगाव 3.6, श्रीरामपूर 11.2 तर राहाता तालुक्यात 6 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सतरा मंडलांत अतिवृष्टी (कंसात मिलिमीटर)
जोऊर : 66.8, चिंचोडी पाटील : 65.8, शेवगाव : 74.3, बोधेगाव :79, चापडगाव : 79, ढोरजळगाव : 68, एरंडगाव : 70.8, दहिगाव ने : 70.8, मुंगी : 75.3, पाथर्डी :69.3, माणिकदौंडी :69.3,टाकळी :70.8, मिरी : 68.5, मिसगाव :65.3, खरवंडी : 71.5व अकोला : 70.8.
बारा टक्के पावसाची तूट
जिल्ह्यात 29 ऑगस्टपर्यंत सरासरी 294.9 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना 257.2 मिलिमीटरची नोंद झालेली आहे. जवळपास 12 टक्के पावसाची तूट आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्यात 498.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.