सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
वडगाव सिन्नर येथील सब स्टेशनच्या पाठीमागे देवनदी वरील निफाडी बंधाऱ्यात गुरुवारी ( दि. 21) सकाळी नऊ वाजता नर जातीचा मृत बिबट्या आढळला. येथील नागरिक सद्दाम शेख यांनी बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितला. नंतर उपसरपंच संदीप आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी तत्काळ वन विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनला खबर दिली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बंधाऱ्याच्या कडेला पाण्यावर तरंगत असलेला बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन-तीन दिवसांपूर्वीच बिबट्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती वन विभागाने दिली. बिबट्याचा मृतदेह मोहदरी येथील वनोद्यानात पाठविण्यात आला.
यावेळी माजी उपसपंच निलेश बलक, ग्रामपंचायत सदस्य अमित गीते, पोलीस पाटील मिरा पेढेकर, पोलीस कर्मचारी अंकुश दराडे, काकड, वन विभागाचे मजूर तुकाराम डावरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.