Nashik News | सुखाेई विमान अपघातात तिघा शेतकऱ्यांचे ५८ लाखांचे नुकसान

निफाड : शिरसगाव येथे सुखोई विमान अपघातस्थळाची पाहणी करताना खासदार भास्कर भगरे.(छाया : दीपक श्रीवास्तव)
निफाड : शिरसगाव येथे सुखोई विमान अपघातस्थळाची पाहणी करताना खासदार भास्कर भगरे.(छाया : दीपक श्रीवास्तव)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिरसगाव (ता. निफाड) येथे मंगळवारी (दि.४) हवाई दलाचे सुखोई-३० विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. यावेळी द्राक्षबाग, कोबी पिक, विहीर, बोअरवेलसह अन्य बाबी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. अपघातात तिघा शेतकऱ्यांचे सुमारे ५७ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

देशभरात एकीकडे लोकसभा निवडणूक निकालांची धामधूम सुरू असताना ओझर धावपट्टीहून नियमित सरावासाठी भरारी घेतलेल्या सुखोई-३० विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुपारी १ च्या सुमारास हे विमान शिरसगाव येथील शेतात कोसळले. तत्पूर्वी दोघा पायलटनी परॉशुटच्या सहाय्याने उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, ज्या भागात हे विमान कोसळले तेथील शेती व अन्य बाबींचे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने सदर भागाचे पंचनामे केलेत.

बाधित शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी

जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांमध्ये शेतकरी सुकदेव पोपट मोरे यांच्या गट नंबर १३२ व १३२ क्षेत्रामधील ०.८८ हेक्टर द्राक्षबागाचे नुकसान झाले आहे. याशिवाय लोखंडी अँगल तारा तसेच ड्रीपच्या साहित्यालादेखील हानी पोहोचली आहे. अपघातामुळे मोरे यांचे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पुढील सहा वर्षासाठी द्राक्षपिक घेता येणार नसल्याने सुमारे ५० लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच लक्ष्मण मोरे व ज्ञानेश्वर यांच्या गट नंबर २६ मधील ०.५० आर हेक्टर बाधित झाले आहे. अपघातानंतर मोरे यांच्या शेतामधील कोबीपिक, बोअर वेल, विहीर, इतर इलेक्ट्रिक वस्तू, मल्चिंग पेपर, लोखंडी अॅगल तसेच तारांना नुकसान पोहचले आहे. या घटनेत मोरे बंधू यांचे सुमारे पाच लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

असे झाले नुकसान

  • गट क्र.१३३, १३२
  • लोखंडी ॲगल व तारा- चार लाख (एकरी)
  • ड्रीपचे साहित्य-दीड लाख रु.
  • द्राक्ष बाग- ५० लाख रु….
  • गट क्र.२६
  • कोबी-एक लाख रु.
  • बोअरवेल-दीड लाख रु.
  • विहीर व इतर इलेक्ट्रिक वस्तू-अडीच लाख रु.
  • मल्चिंग पेपर, ड्रीपचे साहित्य- ३० हजार
  • लोखंडी अँगल आणि तारा-५० हजार

——

सुखोई-३० विमानाच्या अपघातामुळे शेती, विहीर व अन्य साहित्याचे नुकसान झाले. सुर्दैवाने जिवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्र किंवा राज्य शासन यापैकी मदत कोणी करायची यापेक्षा बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर उभे करणे आवश्यक आहे.

-भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news