जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ येथे दि. 29 मे रोजी रात्री झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा सहकारी सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिसरा संशयित आरोपी व या घटनेतील मुख्य सूत्रधार असलेल्या करण पथरोड यास नाशिक येथून अटक केली आहे. आतापर्यंत या दुहेरी हत्याकांडात तीन संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी आपली पथके ठिकठिकाणी रवाना केलेली आहे.
भुसावळ शहरातील जळगाव नाकाकडे जाणाऱ्या जुना सातारा या ठिकाणी असलेल्या मरी माता मंदिर समोर स्विफ्ट डिझायर गाडीवर गोळीबार करून त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी राजू सूर्यवंशी, चावरीया यांना आधीच ताब्यात घेतलेले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित ज्याने बारसे व राखुंडे यांच्यावर फायरिंग केली त्या करण पथरोड याला गुंडाविरोधी पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतूस मिळून आल्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या खुनामागे राजकीय तसेच व्यवसाय संबंध असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही संतोष बारसे यांचे वडिल मोहन बारसे यांचाही भर चौकामध्ये खून करण्यात आला होता.