मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले की, येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडीकल कीटची, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी. सुक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी अचूक देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.