नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपचे जे. पी. गावित यांनी मात्र भगरे यांच्या उमेदवारी विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीकडून माकपसाठी दिंडोरीची जागा सोडावी असा त्यांचा आग्रह होता.
गावितांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली होती. मात्र, आज दि. 6 अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गावित यांनी माघार घेतील असून भास्कर भगरे यांना या मतदारसंघात मोठा दिलासा मिळाला आहे.
गावित यांना दिंडोरीची जागा माकपला द्यावी अन्यथा भास्कर भगरे यांना पाडणारच अशी भूमिका घेतील होती. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीची वाट खडतर होणार अशी चिन्ह होती. त्यामुळे शरद पवार गटाकडून गावित यांना माघारीसाठी गळ घातली जात होती. जयंत पाटील यांच्या पाठोपाठ अखेर शरद पवार यांच्या शिष्टाईला यश आले असून गावित यांनी माघार घेतल्याने दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या भास्कर भगरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर, दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंडामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचीही डोकेदुखी वाढली होती. चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भारती पवारांना विरोध केला होता. मात्र, चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनाही या मतदारसंघात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीकडून भास्कर भगरे व महायुतीकडून भारती पवार अशी लढत या मतदारसंघात आता होणार आहे.