मोदींची हवा संपली – खा. राऊत यांची टीका | पुढारी

मोदींची हवा संपली - खा. राऊत यांची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे असे काही नाही, भाजपच्या लोकांनी इथल्या लोकांना फसवून विजय मिळवला आहे. संपूर्ण देशातील वातावरण बदलले असून, राज्यातील मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही. मोदी येतात कधी जातात कधी हेच कळत नाही. मोदींची हवा संपलेली आहे, अशी टीका खा. संजय राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदारसंघांतील उमेदवारांचे बुधवारी (दि. २४) अर्ज दाखल करताना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटकपक्षांतर्फे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

राऊत पुढे म्हणाले, जळगाव, दिंडोरी, नाशिक या जागेवर महाविकास आघाडी जिंकणार आहे. उद्याची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांचे अस्तित्वदेखील संपणार आहे. संतुलन कोणाचे बिघडले हे चार जूननंतरच समजेन. गिरीश महाजनांनी जागा ५० लाखांच्या लीडने जिंकणार, असे म्हटले नाही हे बरं, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही खा. राऊत म्हणाले.

आरोपीच भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये
सिंचनासह व शिखर बँक यातील ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत मोदी पूर्वी आरोप करीत होते. आता आरोपीच भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यानंतर शिखर बँक घोटाळ्याचा डाग धुतला जातो, यावरून मोदी किती खोटारडे आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे, हे दिसून येते. मोदी हे खोटे बोलणारे नेते आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

हेही वाचा:

Back to top button